संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे नेहमीच गरिब, वंचित, समस्या घेऊन आलेल्यांना नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. शासन, प्रशासनाकडील जनतेची कामे तर ते मार्गी लावत असताच. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत घर गेल्यामुळे बेघर झालेल्या औरंगाबादच्या लोक गायिका कडूबाई खरात यांना घर देण्याचा शब्द नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात दिला होता आणि अवघ्या दोन महिन्यातच नाना पटोले यांनी त्यांना घर देऊन वचनपूर्ती केली आहे.
‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे’ या लोकप्रिय गीताच्या गायिका कडूबाई खरात यांचे घर अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आले होते. त्यांचा संसार उघड्यावर आला होता. दोन महिन्यापूर्वी मागासवर्गीय मेळाव्यात त्यांनी माजी सामाजिक न्यायमंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना भेटून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती केली होती. चंद्रकांत हंडोरे यांनी नाना पटोले यांना कडुबाई खरात यांना घर देण्यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली असता त्याच मेळाव्यात नाना पटोले यांनी कडूबाई खरात यांनी घर देण्याचे आश्वासन दिले होते.
अवघ्या दोन महिन्यातच नाना पटोले यांनी कडूबाई खरात यांच्यासाठी औरंगाबाद येथे घर आणि संसारोपयोगी साहित्यही उपलब्ध करून दिले. उद्या सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, गोकुळधाम, सुंदरवाडी, बीड रोड, औरंगाबाद, येथे नाना पटोले यांच्या हस्ते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत खरात आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.