संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :: सानपाडा सेक्टर ८ मधील गणेश मंदिर व पोलिस स्टेशनबाजूच्या हुतात्मा बाबू गेनू मैदानाचे सुशोभीकरण करून तेथील बकालपणा तातडीने घालविण्याची लेखी मागणी सानपाडा, प्रभाग ७६मधील भाजपाचे युवा नेते पांडूरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सानपाडा, सेक्टर ८ मधील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे हुतात्मा बाबू गेनू मैदान आहे. याच मैदानात भाविकांसाठी जागृत असे नवसाला पावणारे गणेश मंदिर आहे, एका कोपऱ्यात सानपाडा पोलिस स्टेशन आहे. या मैदानाला आजमितीला पूर्णपणे बकालपणा आला असून यामुळे परिसराच्या सौंदर्यातही अडथळे निर्माण झाले आहेत. या मैदानावर पावसामुळे पूर्णपणे जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दगडी व काही ठिकाणी मातीचे ढिगारे तसेच कचरा आहे. अस्ताव्यस्त पडलेली वाहने आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने क्रिडांगणातील जंगली गवत काढून टाकल्यास त्या ठिकाणी मुलांना खेळता येईल व परिसराला त्यामुळे आलेला बकालपणा काही अंशी नष्टही होईल. तसेच मैदानात अस्ताव्यस्त पडलेली वाहने मग ती स्थानिक रहीवाशांची असो अथवा पोलिसांची असो, ती वाहने एका ठिकाणी शिस्तीत लावल्यास मैदानाचा अधिकाधिक वापर करणे स्थानिक रहीवाशांना व मुलांना शक्य होईल. मैदानातील जंगली गवत तसेच कचरा हटविण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी समाजसेवक पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.