संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना आपला संसार उघड्यावर आला असल्याचे सांगितले असता त्यांनी घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. अनेक राजकीय व्यक्ती अशीच आश्वासने देतात असा आपला अनुभव होता मात्र नानाभाऊ पटोले हे थापा मारणाऱ्यांपैकी नसून दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत हे त्यांनी आज दाखवून दिले आहे, याचा खूप आनंद झाला. दोन महिन्यात त्यांनी हक्काचे घर दिले. काँग्रेस पक्ष नेहमीच गरिबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतो, असेच गरिब, वंचितांच्या पाठीशी उभे रहा, या शब्दात लोककलावंत कडूबाई खरात यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नाना पटोले यांच्या उपस्थितीत लोककलावंत कडूबाई खरात यांना हक्काच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, प्रदेश सांस्कृतिक सेलचे विष्णू शिंदे, मुजाहिद खान, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात कडुबाईंचा सत्कार करत असताना त्या मला घराबद्दल बोलल्या होत्या, त्यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं होतं की काँग्रेस तुम्हाला घर बांधून देईल. डॉ. बाबासाहेबांचा विचार सांगणाऱ्या कडूबाईंना घर नसेल तर आमचा काही उपयोग नाही त्याच भावनेतून घर बांधून देण्याचा विचार समोर आला. आज त्यांचा आनंद पाहून माझ्या डोळ्यात आनंदअश्रू आले आहेत. अत्यंत गरीबीची आणि हलाखीची परिस्थिती असतानाही औरंगाबादमध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांसमोर पोहचवण्याचे महान कार्य कडूबाई करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला नसता तर मीही तुमच्या समोर उभा राहिलो नसतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवताना कडूबाईंनी कधी पैशाची चिंता केली नाही. उपाशी राहुन बाबासाहेबांचा विचार मांडणारी कडूबाई ही रमाईच आहे. आज काही लोक गरिबांची भाकरी हिरावून घेण्याचे काम करत आहेत, त्याविरोधात बहुजनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेबांचा, बहुजनांचा विचार घेऊन लढाईत उतरायचे आहे. आंबेडकरांच्या विचाराची ताकद ही वंचित, गोरगरिबांसाठी आणखी ताकदीने उभी करायची आहे. देश वाचवायचा आहे, संविधान वाचवायचे आहे. गरिब, वंचित समाज मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत माझा हा संघर्ष सुरुच राहणार आहे, असे पटोले म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे म्हणाले, मागासवर्गीय समाजाच्या मेळाव्यात कडूबाईंनी त्यांची व्यथा मांडली होती. अनेक नेत्यांना भेटली, त्यांनी आश्वासनं दिली पण निवारा उपलब्ध झाला नाही. ही बाब मी नानाभाऊ यांच्या कानावर घातली आणि मदत करण्याची विनंती केली. त्याचवेळी नानाभाऊंनी घर देण्याचा शब्द दिला होता. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण नानाभाऊ यांनी खरी करून दाखवली. दोन महिन्याच्या आत नवा फ्लॅट घेऊन दिला. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले वंचित, बहुजन यांच्या समस्या सोडवण्यात सातत्याने झटत आहेत. सर्वांसाठी काम करणारा नेता म्हणून जनता नाना पटोले यांच्याकडे पहाते असे हंडोरे म्हणाले.