सोलापूर : अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या व सीसीटीएनएस हैकथॉन अॅड सायबर चॅलेंजेस या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या हवालदार इक्बाल शेख यांच्या आजवरच्या एकूणच कर्तव्याची दखल घेऊन मास्टरदीप शैक्षणिक संस्थेने ‘द मेड मॅन अॅवॉर्ड २०२१ ने देऊन सन्मानित केले. सदर सन्मान सोहळा अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टी फंक्शनल हॉल येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे जयसिंह शंकरराव मोहिते पाटील चेअरमन, कु. रिंकू राजगुरू सिनेअभिनेत्री (सैराट फेम आर्ची), कु. आर्या घारे सिने अभिनेत्री, मास्टरदीप शैक्षणिक संस्थेचे संस्थापक दीपककुमार बोडरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख हे सन २००३ साली कोल्हापूर पोलिस दलात भरती होऊन २००८ पर्यंत कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत होते. २००८ ते आजतागायत सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख यांनी आजतागायत विविध स्पर्धेतून सहभाग घेऊन १० सुवर्ण, ७ रौप्य व ११ कांस्य पदके पटकाविली आहेत. सन २०१८ साली महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्णपदकासह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानित केले होते. तसेच सन २०१९ साली लखनौ (उत्तर प्रदेश) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावामध्ये सुवर्ण पदक पटकावून भारत देशात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र पोलीस संघाने ६२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. या उत्तम कर्तबगारीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हवालदार इक्बाल शेख यांना सन्मानित केले आहे.
सन २०२० मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नवी दिल्ली यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाकडून सहभाग घेऊन राष्ट्रीय पारितोषिक पटकावले. या कामगिरीची दखल घेऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री जे किशन रेड्डी व केंद्रीय गृह मुख्य सचिव अजय कुमार भल्ला यांनी गौरविले आहे.
दरम्यान, सन २०२१ मध्ये राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या सीसीटीएनएस हैकथॉन अॅड सायबर चॅलेंजेस या स्पर्धेत सहभाग घेऊन भारत देशातून पहिल्या दहा क्रमांकाच्या स्पर्धकांमध्ये निवड करण्यात आली. त्याबद्दल अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनीही कौतुक करून सन्मानित केले. तसेच ०१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात सन्मानाचे मानले जाणारे पोलिस महासंचालक पदक तत्कालीन पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी प्रदान करून हवालदार इक्बाल शेख यांना सन्मानित केले आहे.
या कार्यक्रमादरम्यान हवालदार इक्बाल शेख यांच्या आतापर्यंत बजावलेल्या कर्तव्याला उजाळा देऊन उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.