संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिघ्यातील बीपीएल कंपनीच्या खोदकामात महानगर गॅस पाईप लाईन लिकेंज होवून दोन जण जळाले. याप्रकरणी संबंधित काम करणारी कंपनी, महानगर कंपनी आणि काम करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी रबाले पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पोलीस ठाण्यात भेट घेवून लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिघ्यात-खोदकाम करताना महानगर गॅस पाईल लाईनला धडक लागून आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोघे जण किरकोळ भाजले असून उभी असलेली एक चारचाकी गाडी जळाली आहे. यातील एक भाजलेला प्रकाश जाधव हा कोपरखैरणेतील गरीब घरातील मुलगा इंटरव्युहला जात असताना तो या घटनेत जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी आर्थिक मदत मिळणे व घडल्या प्रकाराची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या काही फेरीविक्रेत्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांनाही तातडीने मदत व नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.
या घटनेनंतर महानगर गॅस कंपनी, टोरंट, बीपीएल कंपनी आणि नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी यांचा समन्वय नसल्याने हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत खाद्य पदार्थांच्या गाड्या बिनधाकपणे उभ्या असतात. दिघा येथील रिलायबल प्लाझा गेट समोरील रस्त्यावर ही आगीची घटना घडली आहे. सदर ठिकाणी केबल टाकण्यासाठी टोरंट कंपनीचे खोदकाम ८ नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतरही सुरु होते. त्यातच जमिनीखाली मशिनने ड्रिलिंग करुन बीपीएल कंपनीचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु होते. या ठिकाणाहून जमिनी खालून गेलेल्या महानगर गॅस पाईप लाईनची माहिती नसल्याने खोदकाम करताना त्याला धक्का लागल्याने गॅस लिकेज झाला. टोरंटचे काम सुरु असताना वापरण्यात आलेले साहित्याने व केबलने पेट घेतल्याने आग पेटली असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
या घटनेमुळे खोदकाम करणाऱ्या कंपनीने व ठेकेदाराने खोदकामाची परवानगी घेतलेली आहे का?, काम करण्यापूर्वी त्यांनी त्या त्या भागात जमिनीखाली कोणकोणत्या केबल्स, गॅसची पाईपलाईन जात आहे का याचीही माहिती घेणे आवश्यक होते. संबंधित खोदकाम करणाऱ्या कंपनीने व ठेकेदाराने तशी कोणत्याही प्रकारची माहिती घेतल्याचे दिसून येत नाही. माहिती जाणून घेतली असती तर खोदकामात अशी दुर्घटना होणे शक्यच नव्हते. अशा प्रकारे खोदकाम करणे म्हणजे त्या त्या भागातील लोकांना जाणिवपूर्वक मृत्यूच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. माहिती न घेता खोदकाम करणे म्हणजे त्या त्या भागातील जिविताशी आपल्या स्वार्थासाठी (काम पूर्ण करून घेण्यासाठी) मृत्यूचा खेळ खेळण्यासारखे आहे. यात दोन जण भाजले आहेत. त्यांची नुकसान भरपाई संबंधित खोदकाम करणारी कंपनी, ठेकेदार व महानगर गॅस यांच्याकडून घेणे आवश्यक आहे. महानगर गॅस कंपनीनेदेखील आपल्या गॅसच्या पाईपलाईनला सुरक्षित कवच देणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडून मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानीच्या नुकसानीची टांगती तलवार कायम आहे. कालच्या दिघ्यातील घटनेप्रकरणी संबंधितांकडून भाजलेल्या मुलांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि खोदकामात बेफिकीरपणा दाखवून जिविताला धोका निर्माण केल्याबाबत खोदकाम करणारी कंपनी, खोदकाम करणारा ठेकेदार आणि गॅस पाईपलाईनला सुरक्षित कवच न देता मृत्यूला आमत्रंण देणाऱ्या महानगर गॅस कंपनीवरही सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबाबतचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.