संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ८७ मध्ये आजारी, अंथरूणाला खिळून असलेल्या रहीवाशांना घरी जावून कोरोना लसीकरणाचा डोस देण्याची मागणी माजी नगरसेवक व शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ संपूर्ण सेक्टर आठ आणि दहामधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय घटक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था गेली पावणे दोन वर्षे करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. शंभर टक्के कोरोना लसीकरणासाठी महापालिका प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. धडधाकट व सुदृढ रहीवाशी शासकीय तसेच खासगी आस्थापनेत जावून लसीकरणाचा डोस घेत आहेत. अंथरूणाला खिळून असलेल्या, आजारी असलेले, अपंगत्वामुळे हालचाल करू न शकणारे असंख्य रहीवाशी हालचाल करू शकत नाहीत. या अंथरूणावर खिळून असलेल्या रहीवाशांनाही कोरोना लसीकरणाचा अधिकार आहे. कोरोनामुक्त परिसर करण्यासाठी विभागातील प्रत्येकाचेच कोरोना लसीकरण आवश्यक आहे. आजही परिसरातील आपल्या घरात, सोसायटी आवारात, शेजारी, परिसरात जे अंथरूणाला खिळलेले आहेत. ज्यांना अपंगत्वामुळे हालचाल करणे शक्य होत नाही. त्यांना कोरोना लसीकरणाचे डोस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्या ज्या घरात अपंग व्यक्ति अथवा अन्य शारिरीक व्याधीमुळे अंथरूणाला खिळलेल्या व्यक्ति आहेत, त्यांच्या घरातील सदस्यांनी, शेजारी-पाजाऱ्यांनी, सोसायटीतील रहीवाशांनी, परिचितांनी तसेच त्या त्या गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रभाग ८७ मध्ये घरोघरी जावून अंथरूणाला खिळून असलेल्या रहीवाशांसाठी कोरोना लसीकरण (डोस) देण्यात यावे. जेणेकरून खऱ्या अर्थांने प्रभागात १०० टक्के लसीकरण होईल आणि प्रभागातील प्रत्येकाला (१८ वर्षावरील) कोरोना महामारीपासून मुक्त करता येईल. प्रभाग ८७ मध्ये घरोघरी जावून अंथरूणावर असलेल्या प्रत्येकाला कोरोना लसीकरण (डोस) उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची मागणी रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.