स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बायोमेट्रीकच्या मशिनकडे हजेरीसाठी रांगा लागत असल्याची गैरसोय लक्षात घेवून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका मुख्यालयात बायोमेट्रीक मशिनची संख्या वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला. समस्येचे गांभीर्य व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहन करावा लागणारा मनस्ताप कामगार नेते रविंद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. महापालिका प्रशासनाने रविंद्र सावंत यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना तात्काळ महापालिका मुख्यालयात अतिरिक्त बायोमेट्रीक मशिन्स बसविण्यात आल्या. कर्मचारी व अधिकाऱ्यांची गैरसोय दूर झाल्याने कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यावर महापालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून अभिनंदनांचा वर्षाव व आभार मानले जात आहे.
महापालिका मुख्यालयात हजेरीसाठी बायोमेट्रीक मशिन नाममात्र असल्याने कामावर येणाऱ्या महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना रांगा लावाव्या लागत होत्या. घरून कामावर येण्यासाठी सहन करावी लागणारी दगदग व महापालिका मुख्यालयात आल्यावर हजेरीसाठी रांगा यामुळे कर्मचारी व अधिकारी त्रस्त झाले होते. कर्मचारी व अधिकाऱ्यांना होत असलेला हा त्रास कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला. आयुक्त अभिजित बांगर यांनीही समस्येचे गांभीर्य जाणून महापालिका मुख्यालयात तात्काळ बायोमेट्रीक मशिनची संख्या वाढविण्याचे संबंधितांना निर्देशही दिले. अवघ्या तीन-चार दिवसात नवी मुंबई महापालिका मुख्यालयात बायोमेट्रीक मशिनची संख्या वाढल्याने महापालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना आता हजेरीसाठी बायोमेट्रीक मशिनसमोर रांगा लावाव्या लागत नाही. महापालिका मुख्यालयात सर्वच पक्षाचे राजकारणी व पदाधिकारी येतात, परंतु आम्हा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दु:ख केवळ कामगार नेते रविंद्र सावंत यांनीच जाणले व प्रशासनासमोर मांडले व या समस्येतून आमची मुक्तता केली असे सांगत कर्मचारी व अधिकारी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार मानू लागले आहेत.