अनंतकुमार गवई
नवी मुंबई : पावसाळ्याच्या अगोदर नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव व कुकशेत गाव परिसरात वृक्षछाटणी करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
पावसाळा आता अवघ्या १५ दिवसावर आलेला आहे. पावसाळीपूर्व कामे महापालिका प्रशासनाकडून सर्वत्र करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव आणि कुकशेत गावामध्ये वृक्षछाटणी करण्यात यावी. पावसाळ्यात झाडांच्या ठिसूळ फांद्या रस्त्यांनी जाणाऱ्या माणसांच्या तसेच वाहनांवर पडण्याची भीती आहे. यामुळे जिवीतहानी व वित्तहानी होण्याची भीती आहे. झाडांच्या वाढलेल्या अतिरिक्त फांद्या, रस्त्यावर आलेल्या फांद्या तात्काळ तोडणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर ६,८,१०, सारसोळे गाव आणि कुकशेत गावामध्ये व्यापक प्रमाणावर वृक्षछाटणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.