संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये कामगारांना किमान वेतन देण्याबाबत नोव्हेंबर अखेर पर्यंत निर्णय घेऊ असे प्रशासनाच्यावतीने आमदार महेश बालदी यांना आश्वासित करण्यात आले आहे, मात्र ३० नोव्हेंबर पर्यंत कामगारांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन करून अमेटी व्यवस्थापनाला धडा शिकवला जाईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी अमेटी व्यवस्थापनाला आज (दि. ०९) दिला. भाताण येथे असलेल्या अमेटी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कामागारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाजपच्यावतीने आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले.
स्थानिक कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळावे तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन झाले. या आंदोलनात पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम, कामगारनेते जितेंद्र घरत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, संजय टेंबे, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पोयंजे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, कसलखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी माळी, प्रफुल्ल माळी, भाताण गाव अध्यक्ष चंद्रकांत भोईर, कृष्णा भोईर, भाताण उपसरपंच केशव गायकर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, अनिल भोईर, सुभाष मुकादम, महेंद्र गोजे, गुरुनाथ पाटील, किरण मुकादम, स्वप्नील भोईर, अशोक भोईर, रुपेश भोईर, नितेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आमदार महेश बालदी यांनी अमेटी युनिव्हर्सिटीची शाखा महाराष्ट्रात असल्याने किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांनी येथील कामगारांना वेतन दिले पाहिजे, असे सांगितले. प्रशासनातर्फे रजिस्टार एस.पी.उपाध्याय व हिरा एस. व्यास यांनी शिष्टमंडळाला सुरूवातीला तीन महिन्यात निर्णय घेऊ असे सांगण्याचा प्रयत्न केला. आमदार महेश बालदी यांनी त्याला विरोध करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बैठक घ्यायला सांगतो व हा प्रश्न आपण येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडणार असल्याचे सांगताच त्यांनी या महिन्याच्या ३० तारखे पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आमदार महेश बालदी यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास भव्य स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा अमेटी युनिव्हर्सिटी प्रशासनाला यावेळी दिला.