संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागातील रूग्णालयीन कामात वापरले जाणारे ऑक्सिजन सिलेंडरची वाहतुक व हाताळणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्णालयीन व्यवस्थेत ऑक्सिजन सिलेंडरची वाहतुक व हाताळणी करण्याचे काम महापालिका प्रशासन ठेकेदारच्या माध्यमातून बहूउद्देशीय कामगारांकडून करत आहे. या बहूउद्देशीय कामगारांना सिलेंडर हाताळण्याचे कोणतेही ज्ञान नसून त्यामुळे अपघात होण्याची पर्यायाने हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिविताला अपाय होण्याची भीती आहे. यापूर्वी ऑक्सिजन सिलेंडर हाताळताना मागे पालिकेच्या ऐरोलीतील रुग्णालयात आणि नेरूळच्या रुग्णालयात नुकतीच घटना घडली आहे. पालिका प्रशासन सिलेंडरची वाहतुक व हाताळणी बहूउद्देशीय कामगारांच्या माध्यमातून करताना त्यांच्या जिवाशी का खेळत आहे, तेच समजत नाही. या बहूउद्देशिय कामगारांना पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ईएसआय सुविधा दिली जात नाही. दुर्घटनेत कामगार जखमी झाल्यास उपचाराची जबाबदारी कोण घेणार? दुर्घटनेत कामगार दगावल्यास जबाबदारी कोण स्विकारणार? याचे उत्तरदायित्वही पालिका प्रशासनाने स्विकारणे आवश्यक असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील अन्य ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच ठाणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ऑक्सिजन सिलेंडर वाहतुक व हाताळणीसाठी जैव वैद्यकीय अभियंता व सहाय्यक वैद्यकीय अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या आरोग्य विभागातील सर्वच रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त करणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकीचे ज्ञान असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही. यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकीच्या कामातून बहूउद्देशीय कामगारांची मुक्तता करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.