संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महालॅंड कंपनीने गुंतवणूकदारांचे घेतलेले पैसे ८ दिवसाच्या आत परत द्यावे अथवा त्या कंपनीच्या बेलापुर येथील कार्यालयासमोर ढोल वाजवा आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई मनसेकडून देण्यात आला आहे.
नवी मुंबई शहर झपाट्याने वाढत असल्याने अनेक गुंतवणूकदार ह्या शहरात गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. त्याचाच फायदा काही बोगस व फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट कंपन्या घेत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे मनसेने प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. त्यापैकी एक महालँड नामक कंपनीने अत्यंत कमी दरात नवी मुंबई विमानतळ किंवा न्हावाशेवा सी लिंक जवळील जमीन खरेदी/विक्री करण्याच्या आकर्षक व फसव्या जाहिराती देऊन लोकांना लुबाडण्याचा प्रकार नवी मुंबईच्या बेलापूर येथील कार्यालयातून सुरू असल्याचे मनसेने म्हंटले आहे. मनसेकडे आलेल्या तक्रारींनुसार १३ गुंतवणूकदारांचे जवळपास १६ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे.
नवी मुंबई मध्ये घर किंवा जागा असावी असे स्वप्न बाळगणारे अनेक मध्यमवर्गीय नोकरदार या अशा फसव्या जाहिराती करणाऱ्या महालँड कंपनीच्या आमिषाला बळी पडल्या आहेत. त्यापैकी काही जणांनी मनसे कार्यालयात संबंधित कंपनीने व्यवहार रद्द करून देखील त्यांचे पैसे परत केले नसल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत. ह्याचाच जाब विचारण्यासाठी मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले व भूषण कोळी ह्यांनी सदर कंपनीच्या कार्यलयात निवेदन देऊन ७ दिवसाच्या आत गुंतवणूकदारांचे संपूर्ण पैसे परत करण्यास सांगितले आहे व तसे न केल्यास महालँड कंपनीच्या कार्यालयासमोर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांसोबत ढोल वाजवा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबरोबरच सामान्य जनतेने अशा फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहनही मनसेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच महालँड व तत्सम गुंतवणूक कंपन्यांना बळी पडलेल्या नागरिकांनी तात्काळ मनसेला संपर्क करण्याचे आवाहन विभाग अध्यक्ष अक्षय भोसले (९६१९६८७१७७) आणि भूषण कोळी (९८२०६७३४३१) यांनी केले आहे. मनसे लवकरच ह्या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्त व संबंधित शासकीय यंत्रणांना भेटून या फसवणूक करणाऱ्या कंपन्यांनाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मनसेने म्हंटले आहे.