सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज तसेच खेळाचे मैदान उभारण्याबाबत ग्रामस्थांचा ठराव
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क व्हावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या याकरिता प्रत्येक प्रभागात ‘आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत त्यांनी बेलापूर ग्रामस्थांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश मंदिर, बेलापूर गाव तलावाजवळ करण्यात आलेले होते. यावेळी बेलापूर विभाग अधिकारी मिताली संचेती, एमएसईबी कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, शिधावाटप निरीक्षक शीतल लाडके, पोलीस निरीक्षक मंगेश बोचकर उपस्थित होते. सीबीडी बेलापूर येथे सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे तसेच बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान उभारण्यात यावे, असे दोन ठराव बेलापूर ग्रामस्थांकडून मांडण्यात आले.
सदर ठराव रविंद्र म्हात्रे यांनी ग्रामस्थांतर्फे सुचविले असून माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथदादा पाटील, माजी नगरसेवक दि. ना. पाटील, बाळकृष्ण बंदरे, नारायण मुकादम, ज्योती पाटील, शैला म्हात्रे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी, राम मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप घोसाळकर, समाजसेवक सुभाष गायकवाड तसेच शेकडो ग्रामस्थांनी सदर ठरावाला अनुमोदन दिले. नवी मुंबईतील सर्वच गावातून पत्रांद्वारे पाठींबा मिळत असून सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईत सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज व्हावे, याकरिता संपूर्ण नवी मुंबईतून मागणी होत आहे. आज बेलापूर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणे व ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान उभारण्याबाबतचा ठराव मांडून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदर विकासकामाला समस्त ग्रामस्थांचा पाठींबा दिल्यामुळे सर्वप्रथम मी ग्रामस्थांचे आभार मानते.
नागरिकांना काहीही लाभ नसलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय बांधण्याकरिता हवा तेवढा पैसा पालिका खर्च करू शकते. परंतु काही नतभ्रष्ट नेत्यांच्या सांगण्यावरून नागरिकांच्या सोयींसाठी निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीला विरोध होत आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे. महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामांच्या निविदा काढल्या जातात, ज्यांचा नागरिकांना काहीही फायदा होत नाही. सदर हॉस्पिटल उभारण्यासाठी सीएसआर निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. सदर हॉस्पिटल मी उभारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधकांना देताच एखाद्या कामाला विरोध असल्यास त्या कामाला गती प्राप्त होते असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. बेलापूर ग्रामस्थांकरिता मी खेळाच्या मैदानासाठी ६ एकरच्या भूखंडाची मागणी मी केलेली आहे. लवकरच त्याजागी सुसज्ज असे स्टेडीयम ग्रामस्थांना खेळण्याकरिता निर्माण होणार असून आमदार निधीतून स्वच्छता गृहे, उद्यान, ग्रामस्थांना व्यावसायिक गाळे उभारून बेलापूर गावही स्मार्ट करणार असल्याचे आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नागरिकांनी त्यांच्या समस्या व मागण्यांचे दिलेल्या निवेदनावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार असून त्यांचे निराकरण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.