नवी मुंबई : शहरातील सामाजिक संस्था व औद्योगिक संस्था यांची संयुक्त बैठक घेण्याची लेखी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिका प्रशासन सदैव तत्पर व प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे शहरातील सामाजिक संस्था आणि औद्योगिक संस्था यांचेही योगदान पालिकेस भेटत असते. महानगरपालिका म्हणून जर या सामाजिक संस्था आणि औद्योगिक संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून FRIENDS OF NAVI MUMBAI या घोष वाक्याखाली महापालिकेच्या विविध विभागातील प्रस्तावित कामांची रूपरेषा दिली आणि सामाजिक संस्था व औद्योगिक संस्थांनी आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या योगदानाची आभार मानून नवी मुंबई शहरासाठी त्यांची पुढील वाटचाल तसेच शहरासाठी करू पाहत असलेल्या विविध क्षेत्रातील, जसे की सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सुशोभीकरण ई. कामे जाणून घेतलीत तर नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिल्या क्रमांकाची महानगर पालिका असा सन्मान मिळवल्या शिवाय राहणार नाही, असे सोमनाथ वासकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच हा उपक्रम राबविल्यामुळे किंवा संमेलन घेतल्यामुळे कोणती सामाजिक संस्था कोणती कामे करू इच्छिते व पालिकेला तसेच शहराला याचा कसा फायदा होईल हे तर स्पष्ट होईलच व महानगरपालिकेवरील आर्थिक बोजाही कमी झाल्याशिवाय राहणार नाही, असे सोमनाथ वासकर यांनी निवेदनात म्हटले आहे.