नवी मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांनी नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांची नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे.
नवी मुंबई शहरात जनआंदोलन, निदर्शने तसेच समस्यांचा पाठपुरावा या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेस पक्षाचे नाव सातत्याने चर्चेत ठेवून पक्षाचा जनाधार वाढविण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार धोरणांचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या सूचनेनुसार रवींद्र सावंत यांनी बेलापुरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या बंगल्यासमोर निदर्शने केली होती. ही कामगिरी नवी मुंबईतील अन्य कोणत्याही कॉंग्रेसी नेत्याला व पदाधिकाऱ्याला जमली नाही. याशिवाय सायन-बेलापुर मार्गावर रास्ता रोको, जुईनगरच्या तलावात उतरून केलेले आंदोलन याशिवाय नेरूळ नोडमध्ये प्रत्येक विषयावर रस्त्यावर उतरुन केलेले आंदोलन यामुळे रवींद्र सावंत यांनी नेहमीच कॉंग्रेस पक्षसंघटना चर्चेत ठेवलेली आहे. नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून एमआयडीसी, महापालिका, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांसह खासगी कंपन्या-कारखान्यांतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविताना रविंद्र सावंत यांनी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेसकडे वळविला आहे.
प्रसिध्दी माध्यमांमध्ये चर्चासत्र, वादविवाद यामध्ये सहभागी होताना कॉंग्रेस पक्षाची भूमिका रवींद्र सावंत यांनी ठामपणे मांडताना पक्षकार्य जनताभिमुख करण्याचे काम केले आहे. रवींद्र सावंत यांची कॉंग्रेस पक्षाप्रती असलेली एकनिष्ठता व कार्य पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रवींद्र सावंत यांच्यावर विश्वास दाखवित त्यांच्यावर नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. सावंत यांच्या नियुक्तीचे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, कामगारांनी उत्साहाने स्वागत करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.