संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com
पनवेल : सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरु असलेल्या नवव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे.
शुक्रवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. त्यामध्ये एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उत्कुष्ट नियोजन, संयोजन, पारितोषिके आणि संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. विनोदी कलाकार ओमकार भोजने हे सुद्धा याच स्पर्धेचा भाग राहिले आहेत. यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनेताच सन्मान त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता प्रेरणादायी ठरला असून राज्यभरातून या करंडकाचे तोंड भरून कौतुक होत आहे.
या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६. ३० वाजता स्पर्धा स्थळ ठिकाणी अर्थात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व रुपये ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप यांची आदरणीय उपस्थिती असणार आहे.
नाट्य चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे. अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७५ हजार रुपये रक्कम स्वरूपात पारितोषिके असून पनवेलमधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पारितोषिक वितरणाच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत डोक्यात गेलंय (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय- ठाणे), फ्लाइंग राणी- (कलामंथन- ठाणे ), लपंडाव (डॉ. पिल्लई कॉलेज- पनवेल), टिनीटस- (कलरफुल माँक- मुंबई), तुंबई (सी. के. ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय- पनवेल), डोन्ट क्विट- (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स- मुंबई), काहीतरी अडकलंय- (गुरु नानक खालसा स्वायत्त्य महाविद्यालय- मुंबई) या उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.