Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. या नागरिकांनी बाबासाहेबांचे वैचारिक स्मारक म्हणून नावाजले जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करावे ही भूमिका जपत नवी मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीवर स्मारकाची माहिती प्रसारित करणारा स्टॉल प्रदर्शित केला आहे.
चैत्यभूमीला भेट देणाऱ्या २० हजाराहून अधिक नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली असून स्मारकाची माहिती घेतली आहे. त्यामधील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने ऐरोली येथील स्मारकस्थळी येऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले. स्मारकामध्ये पहाटे ५ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५ हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देत या पुतळा नसलेल्या बाबासाहेबांच्या आगळ्या वेगळ्या ज्ञानस्मारकाचे कौतुक केले आहे. याठिकाणी नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार आणि चहापान व्यवस्था करण्यात आली होती.
स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र मांडणारे दूर्मीळ छायाचित्र दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, आभासी चलचित्र प्रणालीव्दारे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच २५० आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा विविध सुविधा पाहून विविध स्तरांतील नागरिकांनी स्मारक पाहून धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.
बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या निबच्या आकारातील स्मारकाचा लांबूनच नजरेत भरणारा ५० मीटर उंचीचा भव्य डोम स्मारकाबद्दलचे आकर्षण वाढवतो आणि स्मारकामध्ये प्रवेश केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची अलौकिक अनुभूती जाणवते, असेही अभिप्राय अनेकांनी नोंदविले.
अशा या बाबासाहेबांच्या वेगळ्या प्रकारच्या स्मारकाची माहिती नवी मुंबईतून महामार्गांद्वारे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचावी यादृष्टीने महामार्गावर स्मारकाची माहिती देणारे व स्मारकाला भेट देण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे होर्डींग नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रदर्शित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे चैत्यभूमी दादर येथे स्टॉल उभारून त्याठिकाणी स्मारकातील विविध सुविधांची माहिती छायाचित्रांसह आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात आलेली आहे. याशिवाय DrAmbedkarSmark या स्मारकाच्या फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम, शेअरचॅट या स्वतंत्र सोशल मिडीया पेजवरूनही महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मारकाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या अनुषंगाने ज्ञान हीच शक्ती हा विचार देणाऱ्या बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक अभिवादन केले.