श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड आणि शिरवणे गावातील स्थानिक रहीवाशांसाठी लसीकरणाचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व शिरवणे नागरी आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारी पुन्हा फैलावण्याची भीतीयुक्त टांगती तलवार पुन्हा नवी मुंबईकरांवर निर्माण झालेली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळत आहे व मृत्यूही होऊ लागले आहेत. नवी मुंबईत रोजगारासाठी, शिक्षणासाठी दररोज हजारोंच्या संख्येने रहीवाशी, मुले, महिला नवी मुंबईत येत असतात. त्यातच नवी मुंबईत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईत येत असतात. नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड आणि शिरवणे गावातील अद्यापि मोठ्या प्रमाणावर स्थानिक रहीवाशांनी अद्यापि बुस्टर डोस घेतलेला नाही. काही रहीवाशांनी तर दुसऱा डोसही घेतलेला नाही. तसेच आजारी असल्याने अथवा बाहेरगावी गेल्याने अनेक विद्यार्थीदेखील कोरोना लसीकरणापासून वंचित असल्याचे विद्याताई भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरोना महामारी अगदी नवी मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. मागील काळात नवी मुंबई शहराने व नवी मुंबईकरांनी कोरोना महामारीत मोठी किंमत मोजलेली आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन उद्रेक होण्यापूर्वी नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड आणि शिरवणे गावातील नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी लसीकरण व अन्य रहीवाशांसाठी बुस्टर डोस देण्यास लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.