गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मधील सिताराम मास्तर उद्यानात पावसामुळे वाढलेले जंगली गवत तातडीने काढून टाकण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा, सेक्टर ९ मध्ये मिलेनिअम सोसायटी व नवभारत प्रेसच्या समोर महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. या उद्यानात सानपाडा कॉलनीतील रहिवाशी या उद्यानात चालण्यासाठी व फिरण्यासाठी येत असतात. सानपाडा, नेरूळ, जुईनगर, तुर्भे परिसरातील हे मोठे व विस्तिर्ण उद्यान व क्रिडांगण आहे. अडीच महिने पडत असलेल्या पावसामुळे या उद्यान व क्रिडांगणात जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रहीवाशांना डासांचा व चिलटांचा त्रास सहन करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना उद्यानात व क्रिडांगणात पावसामुळे वाढलेले जंगली गवत काढण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.