गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
- पाणी प्रश्नी केला पाणी चोरांचा जाहीर निषेध !
- अतिरिक्त शहर अभियंत्यांना मजकूर लिखित मडका भेट
- इतर शहरांना दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी
नवी मुंबई : स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबई शहरातील पाणी समस्या गेल्या काही महिन्यांपासून गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना ‘कोरड घशाला आणि घागर उशाला’ अशा स्थितीत नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे भाजपचे युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या संयम व सहनशीलतेचा अखेरीला अंत झाला. शुक्रवारी सुरज पाटील यांनी आक्रमक होत अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांची भेट घेत आपले म्हणणे मांडले .तसेच त्यांना मातीच्या मडक्याची भेट दिली. त्याचबरोबर नवीमुंबईकरांचे हक्काचे पाणी इतर शहरांना वळती करणे त्वरित बंद करा अशी आग्रही मागणी केली.
नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे मोरबे धरण आहे. मागील दीड दोन वर्षापुर्वी शहरतील नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता. परंतु कालांतराने शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याबाबत प्रशासनाकडुन बेफिकरी, इतर शहरांना पाणी वळते करणे असे प्रकार वाढले. त्याप्रमाणे नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रातील कुकशेत, सारसोळे, नेरुळ कॉलनी परिसरात पाणीटंचाई व कमी दाबाने पाणीपुरवठा हीच परिस्थिती निर्माण झाली. आजच्या परिस्थितीमध्ये नेरूळ परिसरात पाणी पुरवठा न होणे, अवेळी पाणी पुरवठा होणे, कमी दाबाने येणे, गढूळ पाणी नागरिकांना मिळत आहे. या समस्यांनी गेल्या काही महिन्यांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. येणारे पाणी कधीही येत असल्याने अनियमित पाणी पुरवठा समस्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच पाणी न येण्यामागील कारण हे शट डाऊनचे पाणी पुरवठा कर्मचारी देत आहेत. यामुळे नागरिकात तीव्र नाराजी असल्याचे सुरज पाटील यांनी प्रशासनाला सांगितले.
इतर शहरांना देत असलेले पाणी बंद करा
नवी मुंबई मनपाच्या मोरबे धरणातून इतर शहरांना पाणी पुरवठा होत आहे. तो तातडीने बंद करावा. तसेच बारवी धरणाकडून १६० एमएलडी इतके पाणी महापालिकेला मिळणार होते. परंतु त्यातील फक्त ८० एमएलडी इतके पाणी दिले जाते असे म्हणत असताना प्रत्यक्षात ४० ते ४५ एमएलडी इतकाच पाणी पुरवठा होत आहे. हे नवीमुंबईकरांच्या हक्काचे पाणी ईतर शहरांना देवुन अधिकारी ह्या पाणी चोरीला साथ देत आहेत का ? अशी संतप्त भूमिका सूरज पाटील यांनी यावेळी मांडली.
पाणी समस्या भयानक गंभीर झाली आहे.यावर तोडगा काढावा, पाणी वळती बंद करणे व पाणी चोरी बंद व्हावी म्हणून शुक्रवारी अतिरिक्त शहर अभियंत्यांना मडका भेट देऊन त्यावर ’आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या. पाणी चोरांचा जाहीर निषेध’ असे लिहिले होते. जर पाणी समस्या सुटली नाही तर रोज पालिकेत येऊन प्रत्येक दिवशी मडके व त्यावरील मजकुराची भेट दिली जाईल, असा इशारा सुरज पाटील यांनी दिला आहे.
रहीवाशांना प्रकर्षाने होतेय सुजाताताई पाटील यांची आठवण
नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गावासह नेरूळ पश्चिमेकडील सर्वच प्रभागातील रहीवाशी आजही तत्कालीन नगरसेविका सुजाताताई पाटील यांच्या आक्रमक भूमिकेची आठवण येत आहे. तत्कालीन बहूचर्चित महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नवी मुंबईकरांना प्रती माणशी १३५ लीटर पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. अशावेळी प्रभागातील सिडकोच्या दत्तगुरु, एव्हरग्रीनसह अन्य सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्यामधील रहीवाशांना, गावातील ग्रामस्थांना पाणीसमस्येला सामना करावा लागणार असल्याचे पाहून सुजाता पाटील यांचा जनसमस्येवर संताप पालिका प्रशासनाला पहावयास मिळाला होता. तुकाराम मुंडे यांना त्या सभागृहातील अनेक नगरसेवक घाबरत असताना केवळ सुजाताताई पाटील यांनी सभागृहात जमिनीवर ठिय्या मांडत प्रशासनाचा हा निर्णय तुघलकी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते. हा निर्णय आमच्या एव्हरग्रीन, दत्तगुरूसह अन्य सिडको सोसायट्या, साडेबारा टक्के भुखंडावरील इमारती, चाळी, सारसोळे व कुकशेत गावावर अन्यायकारक असल्याचे जमिनीवर ठिय्या मारत सुजाताताई पाटील यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले होते.