गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर असून या शहरामध्ये सर्व सुखसुविधा आहेत व नवी मुंबई महापालिकेला उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याव्यतिरीक्त नवी मुंबई शहर हा मुंबईला लागून असल्याने आधुनिक शहराचा दर्जा या शहराला लाभला आहे. तसेच या शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असून या खाडीत जगप्रसिद्ध अशा फ्लेमिंगो व विविध पक्षाचा तसेच फुलपाखरू यांचा वावर असतो. तसेच नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखली जाते याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मंत्रालयातील कार्यालयात भेट घेऊन नवी मुंबई येथील सारसोळे पामबीच लगत असलेल्या १२ एकराच्या मोकल्या भूखंडावर फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) नेमका काय आहे ? तो कसा उभारतात ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात अनेक ठिकाणी तसेच वैयक्तिक असे फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारले गेले आहेत. जसे सिंगापूरच्या धर्तीवर असलेले फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) आहे तसे नवी मुंबईच्या धर्तीवर फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) बनविल्यास ते एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येईल. तसेच उद्यानातील विविध प्रकारचे रंगबेरंगी फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) पाहण्यसाठी पर्यटकांची संख्याही वाढेल. या फुलपाखरू उद्यानामुळे नवी मुंबईचा दर्जा ही वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होईल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल आणि एक सुंदर पर्यटनाला चालना मिळेल.
यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की सदर बाबत तपसणी करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. यामुळे पक्षीप्रेमी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले असून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे.