गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दिघा ते बेलापुरदरम्यान बोगस डॉक्टरांविरोधात शोध मोहीम उघडून त्यांच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापुरदरम्यानच्या परिसराचा समावेश होत आहे. नवी मुंबईत विकसित झालेला शहरी भाग व ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांचा गावठाण परिसर, माथाडी वसाहती, सिडको वसाहती, चाळी, खाण परिसर, डोंगराळ परिसर, आदिवासी भाग असा वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा येथे समावेश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात शिक्षणासाठी, रोजगार-व्यवसायासाठी आले असल्याने येथे मिनी भारताचे स्वरूप पहावयास मिळते. या ठिकाणी झोपडपट्टी, चाळी, गावठाण परिसर, साडे बारा टक्के भुखंडावर उभारलेल्या वसाहती, खाण अथवा डोंगराळ परिसर व अन्य भागात बोगस डॉक्टर कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. अनेक दवाखान्यावर डॉक्टरांच्या विचित्रच पदव्या पहावयास मिळतात. अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांना मिळालेले वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांच्या दवाखान्यात लावलेले पहावयास मिळत नाही. महापालिका प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांविरोधात कधीही शोध मोहीम राबविण्यात येत नाही. महापालिका स्थापनेपासून आजपर्यत २८-२९ वर्षाच्या काळात महापालिका प्रशासनाने किती वेळा बोगस डॉक्टरांसाठी शोध मोहीम उघडली आहे. आजतागायत पालिका प्रशासनाला किती बोगस डॉक्टर सापडले आहेत?, किती डॉक्टरांवर कारवाई झालेली आहे? याचे उत्तरही महापालिका प्रशासनाला देता आलेले नाही. तुर्भे, ऐरोली, ठाणे-बेलापुर पट्टीतील नवी मुंबईतील एमआयडीसी परिसर, कोपरखैराणे माथाडी वसाहती, एमआयडीसीतील झोपडपट्टी, चिंचपाडा, दिघा परिसर, बेलापुरचा डोंगराळ भागातील चाळी, ठिकठिकाणच्या एलआयजी वसाहती, नवी मुंबईतील गावठाण परिसर यासह अन्य भागात आजही मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरामध्ये व्यापक प्रमाणावर बोगस डॉक्टर शोधमोहिम उघडणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची छाननी करणे आवश्यक आहे. दवाखाने, हॉस्पिटल या ठिकाणी त्यांची प्रमाणपत्रे (झेरॉक्स) भिंतीवर दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. बोगस डॉक्टर रूग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी अनेकदा हेवी डोस देत असतात. त्यामुळे रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची तसेच रूग्ण दगावण्याचीही भीती असते. बोगस डॉक्टर शोध मोहीम अभियानात महापालिका प्रशासनाकडून आजवर उदासिनता दाखविली जात असल्याने बोगस डॉक्टर बिनधास्तपणे व्यवसाय करत असणार. नवी मुंबईकरांचे आरोग्य बोगस डॉक्टरांच्या विळख्यात सापडून अनेक कूंटूंबे उद्धवस्त होण्याचे संकट टाळण्यासाठी आपण नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिघा ते बेलापुरदरम्यान कार्यरत असणाऱ्या सर्वच दवाखाने व रूग्णालयाची झाडाझडती घेवून बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम उघडण्याचे आदेश देण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.