गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील तिरंगा सोसायटी ते भारत सोसायटीदरम्यानच्या रस्त्याची तातडीने डागडूजी करून या ठिकाणी असलेले खड्डे बुजविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
अडीच महिने संततधार स्वरूपात पाऊस पडत असल्याने जुईनगर सेक्टर २३ मधील तिरंगा सोसायटी ते भारत सोसायटीदरम्यानच्या रस्त्याची चाळण झाली असून या ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या ठिकाणाहून वाहने ये-जा करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकीचालकांना पावसात अंदाज न आल्याने ते घसरून पडले आहेत व त्यांना जखमाही झाल्या आहेत. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना रस्त्यावरून वाहने गेल्यावर अंगावर पाण्याचा अभिषेक पाडून घ्यावा लागतो. कपडे खराब होतात. या खड्डेमय रस्त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. या ठिकाणी स्वामी समर्थांचा मठ असल्याने भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या खड्डेमय रस्त्याचा त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. आपण या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची व रस्त्याची डागडूजी करण्याचे संबंधितांना निर्देश देवून संबधितांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.