गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा भाजपा अध्यक्ष संदीप नाईक यांनी नेरुळ सेक्टर ६ येथील स्लॅब कोसळलेल्या तुलसी भवन सोसायटीला भेट दिली. नेरूळ सेक्टर ६ येथील तुलसी भवन सोसायटीमधील इमारतीचा स्लॅब बुधवारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर डी. वाय. पाटील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही इमारत १२.५%भूखंडावर बांधण्यात आली आहे. या इमारतीला १९९८- १९९९ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र (ओ.सी.) मिळाली होती. इमारतीमधील घराचे दुरुस्तीचे काम सुरू असताना सदर दुर्घटना घडली. भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदिप नाईक यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व येथील रहिवाशांबरोबर चर्चा केली. जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांना श्रद्धांजली वाहिली
अति पर्जन्यवृष्टी, जुन्या तंत्रज्ञानाने केलेले बांधकाम व त्या काळचे बांधकाम साहित्य याचा परिणाम बांधकामावर होत आहे. आणि अशा दुर्घटना घडत आहेत. धोकादायक इमारतींमध्ये जीवितहानी होऊ नये या गोष्टीचे गांभीर्य प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. आज एमआयडीसी भागात, गावठाण भागात, सिडको निर्मित इमारती, तसेच वाणिज्य वापराच्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत आणि म्हणून संबंधित प्राधिकरण म्हणजेच सिडको, एमआयडीसी, महापालिका यांच्यासह सोसायटी आणि नागरिकांनी जागरूक राहून पुढाकार घेत स्ट्रक्चरल ऑडिट करावे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत आणि जीवितहानी होणार नाही, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी केले.
संदीक नाईक यांच्यासमवेत घटनास्थळी माजी नगरसेवक सुरज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार, भाजपचे प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष प्रदीप बुरकुल, शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख व वाहतुक सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख दिलीप आमले यांच्या भाजपचे पदाधिकारी व इतर राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.