गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला वारंवार साकडे घालूनही समस्येचे निवारण झालेले नाही. २८ ऑगस्टपर्यत सेक्टर सहा व सारसोळे गावातील पाणी समस्येचे निवारण न झाल्यास रस्त्यावर उतरून पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा आणला जाईल, असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना व सारसोळे गावच्या ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाच्या व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे निवारण व्हावे यासाठी अनेक वेळा पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समस्या आणून दिलेली आहे. मध्यंतरी पालिका अधिकाऱ्यांना हंडा भेटही दिलेली आहे. प्रत्येक वेळी सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहाच्या पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी केवळ आश्वासनच दिले जाते, परंतु आजतागायत या समस्येचे निवारण झालेले नाही. २८ ऑगस्टपर्यत या कमी दाबाच्या व अपुऱ्या पाणीसमस्येचे निवारण न झाल्यास महापालिका प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा खणखणीत इशारा सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून दिला आहे.