गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका कविता जाधव व माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या वतीने १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सीवूडस येथील गौरव महाविद्यालयामध्ये नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, भारतात निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो, याच अनुषंगाने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे अशा तरुण युवक व युवतीने आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून आज माजी नगरसेविका कविता जाधव व माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या वतीने सीवूडस येथील गौरव महाविद्यालयामध्ये नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्पुर्द प्रतिसाद दिला. तसेच या शिबिराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या मतदार ओळखपत्रामधील नावामध्ये, पत्यामध्ये बदल झाले आहेत ते सुधारून देण्याचे काम आज या शिबिरामध्ये होत आहे. ज्या नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सुद्धा त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशा नागरिकांना मतदानापासून वंचित राहू नये याकरिता त्यांचेही नाव नोंदणी केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या कार्डामध्ये काही त्रुटी असतील त्याही सोडविण्याचे काम या शिबिराद्वारे झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदर दर रविवारी सीवूडस विभागातील तरुण-तरुणींना व ज्येष्ठ नागरिकांना नवीन मतदार नोंदणी करावयाची असल्यास माजी नगरसेविका कविता जाधव व माजी नगरसेवक भरत जाधव यांच्याशी संपर्क साधावा. जेणेकरून तरुण-तरुणींना व ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. तसेच सदर नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन हे पूर्णतः १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघात विभाग निहाय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, कुठल्याही नागरिकांचा मतदानाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तसेच आपल्या देशात लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी करून घेतली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक भरत जाधव, माजी नगरसेविका कविता जाधव, रणजीत निंबाळकर, आदित्य जाधव, ,अभि कदम, विनायक गिरी, अज्यू कदम, मयूर कल्युड, प्रसाद ठाकूर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.