गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या शाळांमध्ये शिक्षकांना मिळत असलेल्या अत्यल्प वेतनाची चौकशी करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
पुण्यापाठोपाठ नवी मुंबईला शिक्षणाचे माहेरघर संबोधले जात आहे. नवी मुंबई शहरामध्ये शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. नवी मुंबई शहरात मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी मात्र सुखावह चित्र नाही. शाळांना अनुदान असतानाही शाळेतील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आजही वेतन मिळत नाही. तुटपुंज्या वेतनात महागाईच्या काळामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आपला संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या वेतनाबाबत व शाळांना मिळत असलेल्या अनुदानाबाबत स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक आहे. महागाईच्या काळात अनेक शाळांमध्ये आजही पाचवा वेतन आयोगानुसारही वेतन मिळत नाही. नवी मुंबईतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत स्वतत्र विभाग लवकरात लवकर कार्यान्वित करून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.