गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसर आणि सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी कॉंग्रेस पक्षाचे सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचे वार्ड क्रमांक ८६ चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव या परिसराचा समावेश होत आहे. पावसाळा कालावधीत जुन, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात डासांची घनता वाढीस लागली आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात ताप, मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण आढळू लागले आहेत. साथीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रूग्ण खासगी दवाखाने व खासगी रुग्णालयात जात असल्याने महापालिका प्रशासन दरबारी साथीच्या आजाराची नोंद होत नाही व त्यामुळे साथीच्या आजारांचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नसल्याचे जीवन गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या डासांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ व रहीवाशी त्रस्त झाले आहेत. सांयकाळनंतर घराची दारे-खिडक्या बंद करून घ्यावी लागत आहेत. सोसायटी आवारातही लोकांना फिरता येत नाही. त्यामुळे साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान राबविणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिकांना होणारे साथीचे आजार पाहता आपण संबंधितांना नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायटी आवारात धुरीकरण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.