गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई – गणेशोत्सव आता जेमतेम महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांची मंडप उभारण्याची आणि महापालिकेची परवानगी घेण्याची लगबग सुरू झाली आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव मंडळांना आर्थिक फटका बसला आहे. मात्र तरीही मंडळांनी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पदरचे पैसे खर्च करत आपले उत्सव सुरू ठेवले आहेत. याची जाणीव ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनामत रक्कम व जागेचे भाडे आकारण्यात येऊ नये याबाबतचे आदेश दिले आहेत त्यानुसार नवी मुंबईत देखील मंडळांना भाडे माफ करावे अशी मागणी बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सव हा २५ दिवसांवर आला असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विविध परवानग्यासाठी धावपळ सुरु आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम आकारण्यात येवू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याची अंमलबजावणी म्हणून ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील मंडळांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेक लहान मंडळांच्या डोक्यावरील काहीसा आर्थिक ताण दूर झाला आहे. नवी मुंबई महापालिकेत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यातून ही मंडळे सामाजिक जनजागृती करत असतात. या मंडळाचा वापर करत पालिकेकडून तिथे स्वच्छता, आरोग्य विषयक तसेच विविध उपक्रमांवाबत जनजागृती केली जाते. या मंडळांकडून भाडे वसूल करून त्यांचा वापर पालिका फुकटात जनजागृतीसाठी वापर करत असते. गणेशोत्सव मंडळे पालिकेला सर्वतोपरी मदत करत असतात. या सर्व बाबी लक्षात घेता मंडळांकडून घेण्यात येणारे भाडे पालिकेने माफ करावे. जेणेकरून लहान सहान मंडळांना वरील आर्थिक भार कमी होईल अशी मागणी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांशी आम्ही चर्चा केली आहे. आयुक्त नार्वेकर यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. गणेशोत्सव मंडळांचे भाडे बंद झाल्यास त्यांना दिलासा मिळेल. गणेशोत्सव मंडळे सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्सव साजरा करत असतात. त्यामुळे प्रशासनाला मदतच होते. या बाबी पालिकेने लक्षात घ्याव्यात अशी सूचना यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत.