स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : डासांच्या नियत्रंणासाठी व डासांपासून फैलावणाऱ्या साथीच्या आजारांना संपुष्ठात आणण्यासाठी नेरूळ-जुईनगर नोडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर चार, दोन तसेच जुईनगर नोड हा अधिकांशपणे सिडको वसाहतींचा परिसर आहे. सेक्टर दोनमध्ये श्रमिकांची तसेच अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची एलआयजी आहे. जुईनगर नोडमध्ये काही प्रमाणात साडे बारा टक्के भुखंडावरील इमारती आहेत सध्या नेरूळ व जुईनगर नोडमध्ये डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. पावसाळ्यापासून सुरू झालेले मलेरिया, डेंग्यू, ताप आदी साथींचे आजार आजही कायम आहे. रहीवाशी खासगी दवाखाने व रुग्णालयात उपचार घेत असल्याने कदाचित पालिका प्रशासनाला या आजारांचे गांभीर्य निदर्शनास येत नसावे. साथीचे आजार हे प्रामुख्याने डासांमुळेच होत असतात. रहीवाशांना सांयकाळनंतर घराच्या दारे-खिडक्या बंद करून आत बसावे लागते, सोसायटी आवारातही फिरता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने केवळ रस्त्यावर धुरीकरण फवारणी न करता प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण केल्यास व सार्वजनिक उद्यान तसेच क्रिडांगणावर धुरीकरण केल्यास व हे धुरीकरण अभियान सातत्याने राबविल्यास डासांच्या त्रासासोबत साथीच्या आजारांचेही प्रमाण नियत्रंणात येईल. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना नेरूळ व जुईनगर नोडमधील संबंधित परिसरातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात तसेच नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजीतील कानाकोपऱ्यात डासांची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.