स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ बसडेपो ते जैन मंदीरासभोवतालच्या परिसरातील वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याचे वाहतुक पोलीसांना आदेश देण्याची लेखी मागणी एमआयएमच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव व रायगड-नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या समस्यानिवारणासाठी ५ ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर, १७ ऑक्टोबर २०२३ रोजी निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात सादर केले होते. आपल्या कार्यालयातून निवेदने केवळ फॉरवर्ड होतात. कारवाई तसेच कार्यवाही होत नसल्याने पुन्हा लेखी निवेदनाचा खटाटोप करावा लागत असल्याची नाराजी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
नवी मुंबई वाशी सेक्टर १७ परिसर हा वर्दळीचा परिसर आहे. वाशी रेल्वे स्टेशन ते कोपरखैराणे या वाशी बसडेापो मार्गे असलेल्या मार्गावर बाराही महिने सतत वर्दळ असते. वाशी डेपोपासून कोपरखैराणे बाजूला वळाल्यावर जैन मंदीरापर्यत गेल्या काही महिन्यापासून रस्त्यावरच वाहन पार्किगचे प्रमाण वाढीस लागले आहे. जवळपास एक ते दोन लेनवर वाहने उभी केलेली असतात. जैन मंदिराच्या दोन्ही बाजूस वाहने उभी असतात. वर्दळीच्या रस्त्यावर मनमानीपणे वाहने उभी असल्याने वाहतुक कोंडी वाढीस लागलेली आहे. विशेष म्हणजे वाशी बसडेपो चौकात तसेच अग्निशमनच्या चौकात वाहतुक पोलीस सतत उभे असतानाही वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. बेकायदेशीररित्या मनमानी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नाही. या ठिकाणी आपण वाशीतील अग्निशमन दल तसेच विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या समोरील बाजून विरुद्ध दिशेला पाहिल्यास वाशी बसडेपो ते जैन मंदीराच्या दोन्ही बाजूस मनमानीपणे वाहन पॉर्किग केल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे कोपरखैराणे दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. याशिवाय पालिकेच्या वाशी रूग्णालयाकडे जैन मंदीरापासून वळसा मारताना दोन्ही दिशेला वाहने उभी असल्याने रूग्णावाहिकांनाही वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागते. वाशी डेपो ते जैन मंदिरापर्यतचा दोन्ही बाजूचा परिसरात तातडीने नो पॉर्किगचे फलक लावून त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर टोईंग लावून तसेच सतत दंड आकारून कारवाई करण्याचे वाहतुक पोलिसांना आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुळातच वाशी डेपो, जैन मंदिर यापासून जवळच विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या मागील बाजूस स्वतंत्र पार्किग व्यवस्था असल्याने तिथे वाहने उभी केल्यास या ठिकाणी वाहतुक कोंडी होणार नाही. जैन मंदिरसमोर तर वाहने उभी असल्याने एक मार्गिका दोन्ही बाजूची (मंदिरासमोरची व मंदिराबाजूची) अडवली जाते. या समस्येवर ठोस तोडगा काढणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांनी येथे उभ्या राहणाऱ्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दररोज कारवाई केल्यास वाहतुक कोंडीची समस्या संपुष्ठात येईल. वाहतुक पोलिसांनी येथे मनमानीपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करून या समस्येचे निवारण न केल्यास एमआयएमच्या वतीने त्याच ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडून समस्येचे गांभिर्य व वाहतुक पोलिसांची उदासिनता जनसामान्यांच्या निदर्शनास आणून देवू . आपण या समस्येचे निवारण तातडीने करण्यासाठी नवी मुंबईच्या वाहतुक पोलिसांना निर्देश देवून ही समस्या संपुष्ठात आणावी आणि या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा द्यावा, असे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
या समस्या निवारणासाठी आम्ही आपल्या कार्यालयाला सतत पत्रव्यवहार करून समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाई झाल्यास कोणीही तिथे वाहन लावणार नाही. वाहन कोंडी होणार नाही. परंतु दुर्देवाने आपल्या कार्यालयातून निवेदने फॉरवर्ड केली जातात. त्यावर कार्यवाही होवून कारवाई होत आहे अथवा नाही याचा अहवाल मागविला जात नसल्याने आपले निर्देश नवी मुंबईचे वाहतुक पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाहतुक पोलिसांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.