नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या आगरी कोळी महोत्सवाचे यावर्षीचे यंदाचे १७वे वर्ष आहे. आगरी कोळी महोत्सवात मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर रायगड, पनवेल, उरण, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई यांची पसंती असते
अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी नामदेव भगत यांच्या सहकार्याने नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर १० जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या दरम्यान भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई शहर हे गेल्या सहा दशकाच्या कालावधीत विकसित झाले असल्याने नवीन येणाऱ्या लोकांना येथील जुन्या लोकांच्या चालीरिती कळाव्या, संस्कृती समजावी, नवी मुंबई वसविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी केलेला त्याग समजावा या हेतूने नामदेव भगत यांनी आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.
आगरी कोळी महोत्सव मध्ये कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचा आकर्षक देखावा, संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्य संस्कृती, सुक्या मासळीचा बाजार, भव्य फनफेअर हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. आगरी-कोळी महोत्सवामध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या मासळींचा आस्वाद घेता येणार आहे. झणकेबाज गावठी मटन व भाकर याबरोबरच अन्य खाद्यपदार्थांचीही रेलचेल असणार आहे. लहान मुलांसाठी दरवर्षी खेळणी, पाळणा याचे विशेष आकर्षण असते.
नवी मुंबई, ठाणे, मुंबईची उपनगरे, उरण-पनवेल भागातून मोठ्या प्रमाणावर नागरीक या आगरी-कोळी महोत्सवामध्ये सहभागी होत असतात. नवी मुंबईकरांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महोत्वाचे आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.