राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८ : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : कोकण दर्पण वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘राज्यस्तरीय समाज दर्पण’ पुरस्काराने माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी सांस्कृतीक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप तिदार, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जेष्ठ साहित्यिक डॉ जी के डोंगरगावकर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व कलाकार विलास चव्हाण, जेष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, जि डी गोवारी कॉलेजचे चेअरमन सूरदास गोवारी, कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक, निवेदक मुकेश शिंदे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दानशूर आणि माणुसकीचे रूप म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची संपूर्ण देशात ओळख आहे. त्यांच्या मुशीतून अनेक समाजसेवक घडले आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कधीही जातीचे आणि पक्षाचे राजकारण केले नाही. मदतीसाठी आला त्याला मदत करणे हा त्यांचा आत्मा आहे. त्यामुळेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान संपूर्ण देशभरात झाला आहे. त्यांचे कार्य हे नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरले आहे. त्यांना जीवनात अनेक गौरव आणि पुरस्कार मिळाले आहेत. समाजाप्रती असलेली आस्था नेहमीच अधोरेखित झाली आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.