नवी मुंबई : एमआयएमचे नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान हे संघटना बांधणीसाठी व कोकणवासियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी घटनास्थळी जावून चर्चा करण्यासाठी कोकण दौऱ्यावर जात आहेत.
मुंबई गोवा महामार्गाबाबत हाजी शाहनवाझ खान यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक कांदा बटाटा मार्केच्या समस्येकडेही राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. नवी मुंबईतील आरोग्य, साथीचे आजार, शिक्षण क्षेत्र, नागरी समस्या याबाबतही हाजी शाहनवाझ खान यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. उलवा नोडमधील धार्मिक प्रार्थनास्थळाबाबतच्या असुविधा, बेकायदा दारूचे अड्डे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगावातील दोघा शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात हाजी शाहनवाझ खान हे मंत्रालयीन पातळीवर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष व पाठपुरावा करत आहेत.
हाजी शाहनवाझ खान या कोकण दौऱ्यात नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जावून संघटना बांधणीवर प्राधान्याने भर देणार आहे. कोकणवासियांना भेटून त्यांना जाणवणाऱ्या असुविधा, समस्या जाणून घेवून त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक जण पदासाठी, खुर्चीसाठी धावपळ करत असताना, परस्परांवर आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा खटाटोप करत असताना कोकणवासियाशी थेट सुसंवाद करण्यासाठी व संघटना बांधणीसाठी हाजी शाहनवाझ खान हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकण भागातील मुस्लिम घटक , मागासवर्गिय घटक, ओबीसी घटकांसह अन्य घटकही एमआयएमकडे आकर्षित होवू लागल्याने हाजी शाजनवाझ खान यांच्या कोकण दौऱ्याने एमआयएमला संघटनात्मक पातळीवर फायदाच होणार असल्याचे बोलले जात आहे.