स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbaiive.com@gmail.com
नवी मुंबई : २५ ठाणे लोकसभा निवडणूक २० मे रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा यादृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विविध प्रसार माध्यमांचा वापर करण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
नवी मुंबई हे स्वच्छतेत देशामध्ये अग्रमानांकित असणारे शहर असून येथील सेवाभावी वृत्तीने काम करणारे स्वच्छताकर्मी दैनंदिन स्वच्छता कार्याप्रमाणेच विविध लोकोपयोगी उपक्रमातही मनापासून सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले लावून त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश प्रसारण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत असून, त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार’, अशा मजकुरातून अभिनव पद्धतीने मतदान करण्याविषयीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मतदान करण्याविषयीच्या जनजागृतीपर संदेशांचे प्रसारण करीत आहेत.