पुणे : जुन्नर तालुक्यातील जनतेला बिबट्यांच्या दहशतीतून मुक्त करण्याची लेखी मागणी जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जयेशभाऊ खांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या पाहता, जुन्नर तालुका बिबट्यांचे माहेरघर झाला आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. जुन्नर तालु्क्यात गावागावामध्ये बिबट्यांचे मनुष्य वस्तीमध्ये येण्याचे प्रमाण वाढले असून लहान बालकांपासून वयोवृद्धांवर हल्ले करून त्यांना जखमी करणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे आदी प्रमाणातही वाढ होत चालली आहे. जुन्नरमधील दररोजची वर्तमानपत्रे आपण चाळल्यास अथवा कात्रणे मागवून घेतल्यास बिबट्यांच्या हल्ल्यांचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल. जुन्नर तालुका बिबट सफारीसाठी आपण घोषित केला, निधीही मंजुर केला, त्याबाबत आपले मनापासून अभिनंदन. परंतु बिबट्याचे वाढते हल्ले व मानवी वस्तीत निवासी वास्तव्य यावरही राज्य सरकारने तातडीने तोडगा काढावा. बिबट्या मनुष्यावर हल्ला करू शकतो, त्याला मारू शकतो, पण त्याच बिबट्यावर हल्ला करणे व त्याला मारणे हा मात्र कायद्याने गुन्हा आहे. बिबट्याने हल्ला केल्यावर उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात, अपंगत्व येते, त्या तुलनेत शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असते. त्यात उपचार करणेही शक्य होत नाही. गावागावात वाढणाऱ्या बिबट्यांच्या संख्येत तुलनेने सरकारकडून पुरेशा प्रमाणात बिबटे पकडण्यासाठी पिंजरेही उपलब्ध होत नाहीत. जुन्नर तालुक्यातील बिबटे नियत्रंणासाठी व त्यांचे ग्रामस्थांवर होणारे वाढते हल्ले संपुष्ठात आणण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा उद्या आपल्या जिवितासाठी ग्रामस्थ बिबट्यांना संपविण्यास मागेपुढे पाहणार नाही, इतके समस्येचे गांभीर्य वाढले असून परिस्थिती स्फोटक बनत चालली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावागावात मुबलक प्रमाणावर पिंजरे उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जयेशभाऊ खांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यापूर्वीही जयेशभाऊ खांडगे यांनी २२ मार्च २०२४ रोजी याच समस्येबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वनविभागाचे सचिव वेणूगोपाल रेड्डी यांना कार्यवाहीसाठी फॉरवर्डही केले. परंतु काहीही कार्यवाही झालेली नसल्याने आजही बिबट्यांची दहशत कायम असल्याची नाराजी व्यक्त करत जयेशभाऊ खांडगे यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.