श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : पनवेल, उरण, नवी मुंबई शहरातील खासगी कोचिंग क्लासेसची चौकशी करण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्रप्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात खासगी कोचिंग क्लासेसचा महापुर आलेला आहे. जितकी क्लासची मार्केटींग मोठी, तितका क्लास मोठा असा पालकवर्गाचा समज झाल्याने खासगी कोचिंग क्लासेस अल्पावधीत लाखोंनी नफा कमवित आहेत. परंतु या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये मुली कितपत सुसक्षित आहेत, त्यांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना आहेत, याबाबत आजवर ना पोलिस गांभीर्याने पाहत आहेत, ना महापालिका ना नगरपालिका प्रशासन. फक्त मुलींची एकादी घटना घडली की चर्चा होते व नंतर लोक विसरुन जातात, असाच प्रकार सुरु आहे. अनेकदा समाजात बदनामी होईल या भीतीने क्लासेसमध्ये चुकीचा प्रकार झाल्यास मुलगी व पालक पोलिसांमध्ये धाव घेत नसल्याने अशा घटनांवर मूठमाती पडत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
या खासगी क्लासेसमध्ये शिकवणी घेणारे खरोखरीच शिक्षक आहेत का? त्यांचे शिक्षण काय आहे? त्यांचा शिकविण्याचा अनुभव काय आहे? त्यांच्याकडे शिकवण्याची पदवी आहे काय? याबाबतही सावळागोंधळ आहे. काही जमले नाही म्हणून उघडा कोचिंग क्लास, पाच-सहा पदवीधर पगाराने कामाला ठेवा व क्लास सुरु करा, असा प्रकार सुरु आहे. या खासगी क्लासेसची महापालिका , नगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीही नसते. सध्याच्या काळात मुली व महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता खासगी कोचिंग क्लासेसची सुरक्षा तपासण्याबाबत नवी मुंबई, पनवेल व उरण पोलिसांना निर्देश द्यावेत. तसेच खासगी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांबाबत नोंद घेण्याचे महापालिका व नगरपालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.