अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत असून विविध ठिकाणांहून दररोज ११० पाणी नमुने तपासण्यात येत असतात.
*सध्याच्या पावसाळी कालावधी लक्षात घेऊन यामध्ये वाढ करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने पाणीपुरवठा विभागास देण्यात आले होते, त्या अनुषंगाने रविवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम आज संपूर्ण महापालिका क्षेत्रात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. यामध्ये नेहमीपेक्षा १० पट अधिक म्हणजे १००० पेक्षा अधिक पाणी नमुने महापालिका क्षेत्रातील विविध भागांतून संकलित करण्यात आले व त्यांची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासण्यात आली. या विशेष मोहीमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.*
केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे विशेष अभियान जाहीर करण्यात आले असून त्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याचा संदेश अधोरेखित करण्यात आलेला आहे. या अभियानात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झाली असून स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम लोकसहभागावर भर देत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत.
अशाच प्रकारे नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचा हा अभिनव उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात आला असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांनी सांगितले.
*या पाण्याच्या चाचणी मोहीमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरूनही पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे.*
या गुणवत्ता चाचणीमध्ये पिण्याच्या पाण्यातील पीएच (pH), Turbidity, TDS (Total Disssolved Solids), Residual Cholrine इत्यादी घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८ ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत आहे. तसेच E-Coli ही चाचणी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तसेच कोकण भवन येथील शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे. सेक्टर ५० मलप्रक्रिया केंद्र येथील प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणीप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिेंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव व वसंत पडघन, उपअभियंता सचिन शिंदे, उपअभियंता स्वप्निल देसाई, कनिष्ठ अभियंता किरण सानप व वैभव देशमुख उपस्थित होते. या मोहीमेत सर्वच विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान दिले.
*पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पाण्याच्या नियमितपणे होणा-या गुणवत्ता चाचणी संख्येत लक्षणीय वाढ केल्याने नमुंमपा क्षेत्रातील पाणी गुणवत्तेचे प्रमाण अधिक बारकाईने लक्षात येईल व त्यानुसार आवश्यकता भासल्यास सुधारणा करणे शक्य होईल असे सांगत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम गुणवत्तेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमाला नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांनी पुढील काही दिवसात आणखी एकदा अशा प्रकारची पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल अशी माहिती दिली आहे.*