शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सहाव्या दिवशी गौरांसह होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात २२ नैसर्गिक आणि १३७ कृत्रिम विसर्जन तलावांवर नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सुनियोजित व्यवस्थेमध्ये निर्विघ्नपणे संपन्न झाला. महापालिका क्षेत्रात सहाव्या दिवशीच्या विसर्जन सोहळयात १४०२२ श्रीगणेशमूर्तींचे व २५६९ गौरींचे विसर्जन करण्यात आले. सर्वच ठिकाणी महानगरपालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.
महापालिका आयुक्त् डॉ. कैलास शिंदे यांनी इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सहाव्या दिवशी १८१९ शाडूच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करुन नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागरुकता दाखविली. शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छता व पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण जपणूकीचा संदेश प्रसारित करण्याच्या आयुक्तांच्या संकल्पनेचे नागरिकांनी स्वागत केले.
त्याचप्रमाणे महापालिकेने संपूर्ण क्षेत्रात १३७ इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांनाही चांगला प्रतिसाद लाभला. कृत्रिम तलावांमध्ये ३१६५ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करण्याचा दृष्टीकोन जपला व इतरांनाही तशा प्रकारचा पायंडा घालून दिला. कृत्रिम विसर्जन तलावांमुळे घराजवळच शांतपणे मनोभावे विसर्जन करता येते अशी भावनाही अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
नमुंमपा क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १०७३३ घरगुती तसेच १२४ सार्वजनिक मंडळांच्या १०८५७ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १३७ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ३१५९ घरगुती तसेच ६ सार्वजनिक मंडळांच्या ३१६५ श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे १३८९२ घरगुती व १३० सार्वजनिक मंडळांच्या १४०२२ श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या १८१९ श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १५९ विसर्जन स्थळांवर २५६९ गौरींसह १४०२२ श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
गौरींसह होणारे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन मोठया संख्येने होत असल्याने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सजगतेने महापालिकेची विसर्जन यंत्रणा तसेच पोलीस दक्षतेने कार्यरत होते. मुख्य विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पुरेशी विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था होती. जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्डस विभाग कार्यालयांच्या वतीने कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत होते. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती. महापालिकेने गर्दीचे विभाजन व्हावे या अनुषंगाने केलेली विसर्जन व्यवस्था व १३७ इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेले कृत्रिम तलाव याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक जपण्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. येथील निर्माल्य सातत्याने निर्माल्य संकलन वाहनांद्वारे उचलून नेले जात असून तुर्भे येथील प्रकल्प स्थळी निर्माल्याचे पावित्र्य राखून स्वतंत्र संकलन करण्याची व योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करणे अशा पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगिकार केला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढील विसर्जन काळातही राखावे व पर्यावरणशील दृष्टीकोन जपत आपल्या गणेशमूर्तींचे घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.