मुंबई : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा दिल्लीतील भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून भाजपाचा निषेध केला तसेच तरविंदसिंह मारवाला अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजपावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी तरविंदसिंह मारवाच्या विधानावर भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.
नागपूरमध्ये व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्यासह शेकडो महिलांनी नारेबाजी करून रस्ता रोको केला, पोलीसांनी यावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना अटक केली.नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला. राज्यातील इतर भागातही काँग्रेसने आंदोलन करून भाजपाचा धिक्कार केला.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात भाजपाच्या आंदोलनावर ट्वीट करत म्हणाले की, आरक्षण बंद करणार, असे खासदार राहुल गांधी कधीही बोललेले नाहीत, त्यामुळे भाजपावाले नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत? भाजपा स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाच्या नौटंक्या करत आहे. भाजपाचे नेते सत्यता पडताळून पाहण्याची तसदीही घेत नाहीत, त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय लागली आहे. भाजपाच्या या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपाच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे हे सत्य जनतेला माहित आहे”. असे थोरात म्हणाले.