अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वृक्षांवर खिळे ठोकून जाहिराती करण्यात येत असल्याचे तसेच काही वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अशाप्रकारे कृत्य करून वृक्षांना तसेच पर्यावरणाला हानी पोहोचवू नये, असे आवाहन नमुंमपा वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वारंवार करण्यात येत असते. त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचा २७ जानेवारी २०२५ रोजीचा ठराव क्र.७४६१अन्वये वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांचेवर दंडात्मक कारवाई करणेबाबत निर्णय घेण्यात आला असून अशा नागरिक /संस्था / व्यावसायिक यांचेकडून प्रतिवृक्ष १० हजार रुपये इतका दंड आकारणेबाबत सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी यांचेमार्फत कारवाई करण्यात येत असते.
बेलापूर सेक्टर ३ येथील पवन रेस्टॉरंट आणि बार यांच्या माध्यमातून त्यांच्या रेस्टॉरंट बाहेरील झाडांवर विद्युत रोषणाई केली असल्याचे आढळून आल्याने बेलापूर विभागाच्या भरारी पथकाने बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली, उद्यान विभाग परिमंडळ १ चे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
यापुढील काळात सर्वच विभागीय कार्यक्षेत्रात याबाबतची विशेष मोहीम राबविली जाणार असून नागरिकांनी / व्यावसायिकांनी झाडांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई करणे अशा प्रकारचे वृक्षांना धोका पोहचविणारे कृत्य करू नये व कारवाईच्या कटू कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे परिमंडळ २ मधील प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकाने उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण कारवाई करताना सेक्टर ८ ऐरोली येथील आशापूरा किराणा स्टोअर्स यांचेकडून प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने १०० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. ५ हजार रक्कमेची दंडात्मक वसूली करण्यात आली. या कारवायाही सातत्यपूर्ण रितीने सुरू राहणार आहेत.