अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकच्या मैदानावर पराभव केला होता. रविवारी मात्र मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या होमपीचवर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीमुळे सव्याज परतफेड केली आहे.
आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही असेच काहीसे दिसून येत आहे. पहिल्या ५ सामन्यात फक्त १ विजय मिळवणाऱ्या मुंबईने आता विजयांची हॅट्रिक केली. आयपीएल २०२५ चा २८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सहज विजय मिळवला आणि सीएसकेविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला.
एमआयने आता विजयांची हॅट्रिक करून प्लेऑफच्या आशा बळकट केल्या आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या विजयाचे हिरो होते, दोघांनीही दमदार अर्धशतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. रचिन रवींद्र पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण करू शकला नाही आणि ५ धावा करून आऊट झाला. यानंतर, पदार्पण करणारा आयुष म्हात्रे आणि शेख रशीद यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाचा धावसंख्या ५० च्या पुढे नेली. म्हात्रे याने १५ चेंडूत ३२ धावा केल्या. संघाची तिसरी विकेट ६३ धावांवर शेख रशीदच्या रूपात पडली.
रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शिवम दुबेसोबत त्याने जबाबदारी सांभाळली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची मौल्यवान भागीदारी केली आणि चेन्नई २०० धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. पण दुबे (५०) आऊट झाल्यानंतर चेन्नईचा धावगती खूपच मंदावली. एमएस धोनीकडून काही फटके अपेक्षित होते, पण तो फक्त ४ धावा काढून आऊट झाला. जडेजाच्या मदतीने, सीएसकेने शेवटच्या पाच षटकांत ५८ धावा केल्या. अशाप्रकारे, सीएसकेने संपूर्ण षटक खेळले आणि ७ विकेट गमावून १७६ धावा केल्या.
जडेजाने ३५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २५ धावा देऊन २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. दरम्यान, दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
वानखेडेवर रोहित शर्माची दादागिरी
या सामन्यात रोहित शर्माने दमदार खेळी खेळली आणि त्याच्या संघासाठी धावांचा पाठलाग करणे सोपे केले. त्याने या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. त्याचे फॉर्ममध्ये पुनरागमन हे मुंबईसाठी चांगले संकेत आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादवनेही अर्धशतकी खेळी केली. रोहितने नाबाद ७६ आणि सूर्याने नाबाद ६८ धावा केल्या आणि मुंबईने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.
धोनीची चेन्नई आयपीएलमधून बाहेर?
या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जला मोठा फटका बसणार आहे, कारण प्लेऑफमधून ते जवळपास बाहेर गेले आहेत. चेन्नईने ८ सामन्यांत फक्त २ विजय मिळवले आहेत. आता जर धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना पुढील सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. पण संघाची कामगिरी पाहता ते काही सोपे दिसत नाही.