छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही फटका बसला आहे. जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली असून बोटी, होडी, जाळी, मत्स्यबीज यासह उपकरणांचे आणि मत्स्यपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी आज नुकसानीचा आढावा घेतला. प्रत्येक मत्स्यपालकांचे नुकसान व्यवस्थित नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकांनाही शासनाची मदत मिळाली पाहिजे यासाठी नुकसानग्रस्त मत्स्यव्यावसायिकांचे तत्परतेने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा असे निर्देशही त्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही, शासन म्हणून आपण मत्स्यव्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगुन त्यांनी उपस्थित मत्स्यव्यावसायिकांना धीर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज छत्रपती संभाजीनगर व लातूर या दोन्ही विभागाच्या नुकसानीबाबत आढावा घेतला. यावेळी विभागाचे आयुक्त किशोर तावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती, सहायक आयुक्त मधुरिमा जाधव आदींसह मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री.राणे म्हणाले, प्रत्येक मत्स्यपालकाचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अचूक नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकानांही शासनाची मदत मिळाली पाहिजे. पंचनामे अचूक करून त्याबाबतचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवा जेणेकरून त्याआधारे तातडीने मदत देता येईल. मत्स्यपालकांना या संकटातून उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे. जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबतचा कार्यक्रम तयार करावा. याबाबत राज्यस्तरीय कार्यक्रमाची आखणी मंत्रालय पातळीवरून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही, शासन म्हणून आपण मत्स्यव्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगून श्री.राणे म्हणाले, नुकसान भरपाईसोबत मत्स्यव्यावसयिकांना विविध सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले त्याठिकाणचे मनुष्यबळ ज्याठिकाणी पंचनामे बाकी आहेत तिथे तातडीने उपलब्ध करून द्यावे. मत्स्यबीजाच्या दरामध्ये असलेल्या तफावतीबाबत आपण लवकरच निर्णय घेणार असून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या तलावांचे पंचनामे वेळेत करण्याबाबतही ग्रामविकास मंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भारती यांनी माहिती दिली. श्री.भारती म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागात ३८५ तलाव आहेत. यामध्ये ३३० तलावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे जाळी, बोटी, होडी, मत्स्यबीज, मत्स्यसाठा याचे नुकसान झाले आहे. तसेच विभागात असलेल्या पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पाचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरू असून याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.
लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शिरिष गाथाडे यांनी लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यांतील नुकसानीबाबत माहिती दिली. श्री.गाथाडे म्हणाले, लातूर विभागात एकूण ५१६ तलाव/जलाशय आहेत. अतिवृष्टीमुळे मत्स्यबीज, मत्स्यसाठी, होडी, जाळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लातुर विभागात चार जिल्हयांचा समावेश असुन लातुर, धाराशिव, नांदेड व हिंगोली या जिल्हयांचा समावेश होतो. लातुर जिल्हयात १५८ तलाव, धाराशिव २३६ तलाव नांदेड ९३ तलाव व हिंगोलीमध्ये ३० असे एकुण ५१६ तलाव / जलाशय आहेत. लातुर विभागात गोदावरी, मांजरा, रेणा, पुर्णा, तेरणा, सिना, तावरजा इ. प्रमुख नद्या आहेत. सद्यस्थितीत मराठवाडयात माहे २५ ऑगस्ट २०२५ ते माहे सप्टेंबर २०२५ अखेर कालावधीत अतिवृष्टी होऊन पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांचे मत्स्यबीज, मत्स्यसाठा, होडी, जाळे इत्यादीचे नुकसान झालेले आहे.
लातुर जिल्हयात १० तालुके असुन ६० मंडळे, धाराशिव जिल्हयात ०८ तालुके व ५७ मंडळे, नांदेड जिल्हयात १६ तालुके व ७३ मंडळे तसेच हिंगोली जिल्हयात ०५ तालुके व मंडळे ३० असुन लातूर विभागात एकुण ३९ तालुके व २२० मंडळे आहेत. २२० पैकी १९२ मंडळात ६५ मिमी पेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
यावेळी मत्स्यव्यावसायिकांनी आपल्या झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. यावेळी मत्स्यव्यवसाय, जलसंपदा, व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



