सानपाडा भाजपकडून महापालिका प्रशासनाला इशारा
नवी मुंबई : १२ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच आठ दिवसाच्या आत सानपाडा विभागातील रस्त्यावरील खड्डे तातडीने न बुजवल्यास त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा लेखी इशारा भाजयुमोचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडूरंग आमले यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांना लेखी निवेदनातून दिला आहे.
सानपाडा परिसरात सेक्टर सातमध्ये सेव्हन्थं डेज हायस्कूल व न्यू अवधूत सोसायटीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहने घेवून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनातील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय त्या रस्त्यालगत असलेल्या पदपथावरुन ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावरही वाहनामुळे पाणी उडून त्यांचे कपडे खराब होत आहेत. या खड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशी व वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना तातडीने या परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.
या समस्यानिवारणासाठी आपणास यापूर्वीही काही वेळा लेखी निवेदने दिलेली आहेत. आपण ते निवेदन संबंधितांना फॉरवर्डही केले होते. तथापि या कालावधीत काहीही कार्यवाही न झाल्याने खड्डे तसेच आहेत. नवरात्रोत्सव आता संपून गेली असून काही दिवसांनी दिवाळी येईल. समस्येचे गांभीर्य व स्थानिकांना होत असलेला त्रास पाहता या परिसरातील रस्त्यावरील खड्डे १२ ऑक्टोबरपर्यत न बुजविल्यास सोमवारी, दि. १३ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत, त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येवून अभिनव पद्धतीचे आंदोलन केले जाईल, असा इशारा पांडुरंग आमले यांनी निवेदनातून मनपा प्रशासनाला दिला आहे.



