‘वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती’
नामदेव भगत यांचा प्रशासनावर थेट निशाणा
स्वयम न्यूज ब्युरो | Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ रेल्वे स्थानक परिसर दिवसेंदिवस गुन्हेगार, व्यसनाधीन आणि समाजकंटकांचा अड्डा बनत चालला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एवढेच नव्हे तर नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यसनाधीन व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्यालाच चाकूचा धाक दाखवून धमकावल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका माजी विरोधी पक्षनेते, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नामदेव भगत यांनी सांगितले की, ४ मे २०२६ रोजीच त्यांनी नवी मुंबई महापालिका, सिडको आणि नवी मुंबई पोलिसांना लेखी निवेदन देऊन नेरुळ स्थानक परिसरातील वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनांचा सुळसुळाट आणि सुरक्षेच्या गंभीर समस्यांबाबत इशारा दिला होता. तसेच नेरुळ पश्चिम येथे स्वतंत्र पोलीस ठाणे किंवा कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणीही केली होती.
“आज ज्या प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यालाच चाकूचा धाक दाखवण्याची हिंमत गुन्हेगारांनी केली, त्यावरून कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने आमच्या निवेदनाची वेळीच दखल घेतली असती, तर अशी लाजिरवाणी परिस्थिती उद्भवली नसती,” असा घणाघाती आरोप भगत यांनी केला.
नामदेव भगत यांनी इशारा दिला की, नागरिकांच्या जीविताशी खेळणारी निष्क्रियता आता खपवून घेतली जाणार नाही. राज्य सरकार, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि सिडको यांनी परस्पर समन्वय साधून नेरुळ परिसरातील कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी तातडीने ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होईल.
नामदेव भगत यांच्या प्रमुख मागण्या
- नेरुळ पश्चिम येथे तात्काळ स्वतंत्र पोलीस ठाणे किंवा कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करावी.
- रेल्वे स्थानक परिसरातील व्यसनाधीन, अतिक्रमण करणारे आणि समाजकंटकांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी.
- रेल्वे स्थानक परिसरात २४ तास पोलीस गस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी.
- महिला, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी सुरक्षा आराखडा तातडीने लागू करावा.
