स्वयम न्यूज ब्युरो | Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेची जाणीव, व्यसनमुक्तीचा संदेश आणि मुलींच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई वाहतूक विभाग (सीबीडी), त्रिमूर्ती व्यसनमुक्ती जनजागृती अभियान आणि अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ११७, दिवाळे गाव, बेलापूर येथे विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक संजय नकाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाथ लोखंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तुषार कदम, समाजप्रबोधनकार दिलीप आमले, केंद्रप्रमुख महेंद्र पाटील, केंद्रप्रमुख गणेश केदारे, वाहतूक पोलीस चंद्रकांत कोळी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका सौ. शोभा कुदळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संजय नकाते यांनी आरटीओचे नियम, नागरिकांची जबाबदारी आणि सुरक्षित वाहनचालक होण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नाथ लोखंडे यांनी वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तुषार कदम यांनी लर्निंग लायसन्सची प्रक्रिया तसेच परिवहन विभागाकडून उपलब्ध विविध सेवांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
समाजप्रबोधनकार दिलीप आमले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना, “सोळावे वर्ष बिघडविण्याचे नसून आयुष्य घडविण्याचे असते. व्यसनापासून दूर राहा, शिक्षणाला प्राधान्य द्या आणि पालक–शिक्षकांचा सन्मान करा,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्त राहण्याची, वाहतुकीचे नियम पाळण्याची आणि जबाबदार नागरिक बनण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. वाहतूक विषयावरील प्रश्नमंजुषेत अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप आमले यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, व्यसनमुक्ती, मुलींचे संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

