आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची वृक्षतज्ज्ञांसोबत विशेष बैठक
काँक्रिटीकरण, चुकीची छाटणी आणि मुळांचे नुकसान प्रमुख कारणे
नवीन एसओपीसह दीर्घकालीन उपाययोजना राबविणार
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
ठळक मुद्दे :
- पावसात झाडे कोसळण्यामागील कारणांचा शास्त्रीय अभ्यास सुरू.
- आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षतज्ज्ञांची विशेष बैठक.
- काँक्रिटीकरण, मुळांचे नुकसान आणि चुकीची छाटणी प्रमुख कारणे.
- झाडांच्या छाटणीसाठी नवीन एसओपी तयार होणार.
- झुकलेल्या झाडांचे सर्वेक्षण, छायाचित्र नोंदणी आणि रिस्क असेसमेंटला प्राधान्य.
- दीर्घकालीन नियोजनातून सुरक्षित व हरित नवी मुंबई घडविण्याचा निर्धार.
नवी मुंबई : जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याच्या घटनांची नवी मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. झाडे कोसळण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षतज्ज्ञांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत झाडे पडण्यामागील शास्त्रीय कारणांचा सखोल ऊहापोह करण्यात आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीला उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांच्यासह वृक्षतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर, डॉ. चंद्रकांत साळुंखे, शर्वरी बर्वे, सारंग फळे तसेच अॅर्बोरिस्ट वैभव राजे उपस्थित होते. जुलै महिन्यात कोसळलेल्या झाडांचा सविस्तर आढावा घेत शहरातील वृक्षसंपदेची स्थिती, मान्सूनमधील धोके आणि भविष्यातील उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत वृक्षतज्ज्ञाांनी स्पष्ट केले की, मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे ही झाडे कोसळण्याची नैसर्गिक कारणे असली, तरी शहरातील वाढते काँक्रिटीकरण, मुळांजवळील खोदकाम, असंतुलित छाटणी, सूर्यप्रकाशाच्या शोधात झाडांचे एका बाजूला झुकणे, पाण्यामुळे सैल होणारी माती आणि काही वृक्षप्रजातींची रचना यांसारखी मानवनिर्मित कारणे अधिक गंभीर ठरत आहेत.
रस्ते आणि इमारतींच्या बांधकामावेळी झाडांच्या मुळांसाठी पुरेशी जागा न सोडणे, विविध विकासकामांमुळे मुळे कापली जाणे आणि त्यामुळे झाडांची जमिनीवरील पकड कमकुवत होणे, ही झाडे कोसळण्यामागील सर्वात मोठी कारणे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. विशेष म्हणजे, रस्त्यालगत आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील ९० टक्क्यांहून अधिक झाडे याच कारणांमुळे पडत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
बैठकीत चुकीच्या छाटणीवरही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी शास्त्रीय पद्धतीऐवजी झाडांची एकाच बाजूने किंवा वरून अनियमित छाटणी केली जाते. त्यामुळे झाडांचे संतुलन बिघडते आणि वादळी वाऱ्यांमध्ये ती सहज कोसळतात. तसेच उंच इमारतींमुळे सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने झाडे प्रकाशाच्या दिशेने झुकतात आणि त्यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण होतो.
तज्ज्ञांनी किनारपट्टी भागातील भूजलपातळी, पावसामुळे सैल होणारी माती आणि पाण्याचा निचरा न होणे यामुळेही झाडे उन्मळून पडण्याचा धोका वाढत असल्याचे सांगितले. गुलमोहर आणि सोनमोहर यांसारख्या वृक्षांच्या फांद्या ठिसूळ असल्याने त्या अधिक तुटतात, तर नारळ आणि ताडाची झाडे वादळात तुलनेने अधिक सुरक्षित असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने झाडांच्या शास्त्रीय छाटणीसाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च-एप्रिलमध्येच नियोजित छाटणी केली जाईल, ऑक्टोबरमधील छाटणी टाळली जाईल आणि झाडांच्या छाटणीपूर्वी व नंतर छायाचित्रे घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शहरातील झुकलेल्या झाडांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास केला जाणार असून, अलीकडे कोसळलेल्या झाडांचा इतिहास आणि जोखीम मूल्यांकनही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात वादळी पावसामुळे नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील अनेक शहरांत मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शास्त्रीय अभ्यासावर आधारित उपाययोजनांमुळे भविष्यात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये घट होऊन शहर अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
