नवी मुंबई : “आपले नवी मुंबई शहर शांतताप्रिय आहे. यंदाचा गणेशोत्सव उत्साहासोबतच पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्यभावनेने योगदान द्यावे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि संस्कृती जपणारे उपक्रम राबवून समाजात चांगल्या गोष्टींची जनजागृती करा,” असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी केले.
यंदा १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि विविध संबंधित प्राधिकरणांची गणेशोत्सव मंडळांसोबत पूर्वतयारी नियोजन बैठक महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महापौरांनी गणेशोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेताना पर्यावरणपूरक उत्सवाबरोबरच नागरिकांच्या सुविधा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणत्याही अडचणीच्या वेळी तातडीने संपर्क साधता यावा यासाठी एकच दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देऊन त्यामार्फत सर्व संबंधित प्राधिकरणांशी संपर्काची सुविधा निर्माण करावी, असे निर्देश महापौर पाटील यांनी दिले. रस्त्यांची दुरुस्ती, स्पीडब्रेकरवर स्पष्ट पट्टे मारणे, दर्शनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक कोंडी होणार नाही अशा पद्धतीने पार्किंगचे नियोजन करणे, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे तसेच केबलचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
पाणीकपात रद्द करण्याची महापौरांची घोषणा
मोरबे धरण ९३ टक्के भरलेले असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीपासून सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महापौर सुजाता पाटील यांनी केली. उत्सव काळात विशेषतः महिलांना पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र पाणीकपात रद्द झाली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहनही महापौरांनी केले. गणेशोत्सव मंडळांनी जलबचतीचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘मूर्ती लहान पण भावना महान’ पुरस्कार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘नवी मुंबई महापौर गणेशदर्शन स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. यंदा घरगुती गणेशोत्सवासाठीही विशेष कॅटेगरी ठेवण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
गणेशमूर्तीच्या उंचीवरून होणारी स्पर्धा टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मूर्ती लहान पण भावना महान’ हे वैशिष्ट्यपूर्ण पारितोषिक देण्यात येणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या सार्वजनिक मंडळांना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
प्लास्टिकला नकार, शाडूच्या मूर्तीला प्राधान्य
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही मंडळांना पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना उपलब्ध करून देण्यात आली असून मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा. यंदाही परवानग्यांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
अनधिकृत बॅनर्समुळे शहर विद्रूप होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निश्चित केलेल्या जागी, आवश्यक परवानगी घेऊनच मर्यादित प्रमाणात बॅनर्स लावावेत, असे आवाहन करण्यात आले. मंडपांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी दोन डबे ठेवावेत तसेच आरोग्यविषयक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले.
शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे महापालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले.
१५० हून अधिक कृत्रिम विसर्जन तलाव
महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील विसर्जनस्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १५० हून अधिक कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिली. गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुधारण्याची कामे पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परिमंडळ उपायुक्त संजय शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा आणि ऑनलाइन परवानगी प्रणालीची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त संदेश नाईक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देत मंडळे व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी पुनरावर्तन संस्थेच्या प्रतिनिधींनी शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून शक्य असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे आणि त्यानंतर ती माती पुनर्वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले.
बैठकीला महापौर सुजाता पाटील यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक विशाल विचारे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, विविध विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच ७५ हून अधिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध सूचनांची महापौर सुजाता पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. पर्यावरणाचे रक्षण, पाण्याची बचत, नागरिकांची सुरक्षितता आणि उत्सवातील शिस्त या चारही बाबींचा समतोल साधत नवी मुंबईचा गणेशोत्सव उत्साहात, शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
