वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
तुर्भे येथून मिरवणुकीचा दिमाखदार शुभारंभ
ऑल इंडिया उलमा बोर्डचा उत्स्फूर्त सहभाग
नवी मुंबई : जश्न-ए-ईद मिलादुन्नबीनिमित्त तुर्भे येथून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हाजी शाहनवाज खान यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी आयोजकांच्या वतीने हाजी शाहनवाज खान यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तुर्भे येथील स्टार्टिंग पॉइंटवरून नात-ए-रसूल, दुरूद व सलाम आणि नियाजच्या आयोजनाने मिरवणुकीला दिमाखदार सुरुवात झाली. वाहनांमधून नात-ए-रसूल पठण करत मोठ्या संख्येने आशिकाने-रसूल यांनी श्रद्धा आणि उत्साहाने सहभाग घेतला. सहभागी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
हाजी शाहनवाज खान यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व
सुमारे २५ वर्षांपासून मखदूम ब्रदर्स यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन केले जात आहे. अल मदीना कमिटीदेखील अनेक वर्षांपासून या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यंदा ऑल इंडिया उलमा बोर्ड, कोकण डिव्हिजन यांनीही आयोजनात सक्रिय सहभाग घेत खांद्याला खांदा लावून सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ऑल इंडिया उलमा बोर्डचे कोकण डिव्हिजन प्रभारी, महाराष्ट्र कोअर कमिटी शूराचे पदाधिकारी, डिव्हिजन व युनिटचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नेरूळ, घणसोली तसेच परिसरातील बोर्डचे सदस्य आणि मोठ्या संख्येने आशिकाने-रसूल ﷺ मिरवणुकीत सहभागी झाले.
२५ वर्षांची परंपरा; यंदा उलमा बोर्डचा सक्रिय सहभाग
मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी इस्लाम शेख, महबूब शेख, शाहरुख खान यांच्यासह ऑल इंडिया उलमा बोर्ड आणि मखदूम ब्रदर्सच्या कार्यकर्त्यांनी नियोजन, शिस्त, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक सुविधांची जबाबदारी तत्परतेने पार पाडली. यावेळी ऑल इंडिया उलमा बोर्डच्या पदाधिकाऱ्यांनी जश्न-ए-ईद मिलादुन्नबी हा प्रेम-ए-रसूल, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा पवित्र उपक्रम असल्याचे सांगितले. विविध संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांत सहभागी होणे हे सामाजिक एकोपा आणि शांतता अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हाजी शाहनवाज खान यांच्या प्रमुख उपस्थितीने, अल मदीना कमिटी, मखदूम ब्रदर्स आणि ऑल इंडिया उलमा बोर्ड यांच्या संयुक्त सहभागातून झालेल्या या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागामुळे तुर्भे परिसरात प्रेम-ए-रसूल, एकता आणि बंधुभावाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

