अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
कॉग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांची आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर-२३ येथील हरीओम मंदिरामागे असलेल्या सुखसागर गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात झुकलेल्या महापालिका उद्यानातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात, अशी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
सुखसागर सोसायटीला लागून महापालिकेचे उद्यान असून या उद्यानातील वृक्षांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात सोसायटीच्या आवारात झुकल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असून जोरदार पाऊस व वाऱ्याच्या वेळी फांद्या तुटून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्यापूर्वीच वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून साथीच्या आजारांचाही धोका वाढला आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून सुखसागर सोसायटीच्या आवारात झुकलेल्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करावी, तसेच परिसराची स्वच्छता करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.


