‘तक्रारी फाईलमध्ये नकोत; प्रत्यक्ष कारवाई दिसली पाहिजे’, हाजी शाहनवाज खान यांची मागणी
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील डीसीपी झोन कार्यालयाच्या आसपास सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मद्यपान तसेच गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारींनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकारांची प्रशासनाने तातडीने ग्राउंड लेव्हलवर चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महाराष्ट्र कोअर कमिटी, कोकण विभाग व गोवा यांच्या वतीने हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.
‘कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेच्या परिसरातच जर नियमांची खुलेआम पायमल्ली होत असेल, तर या प्रकारांना नेमके कोणाचे धाडस मिळत आहे?’ असा सवाल उपस्थित करत संघटनेने या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.
कोणत्याही व्यक्तीवर किंवा व्यवसायावर चौकशीपूर्वी आरोप करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट करत, जर तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचे संरक्षण, स्थानिक पातळीवरील संगनमत किंवा बेकायदा व्यवसायाला पाठबळ आढळले, तर त्याचीही कायदेशीर चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका हाजी शाहनवाज खान यांनी मांडली आहे.
परळ–चिंचपोकळीतील परिस्थितीचीही गंभीर दखल घ्या
मुंबईतील परळ–चिंचपोकळी परिसरात मद्याच्या नशेतून होणारे वाद, भांडणे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांचा विचार करता प्रशासनाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे हाजी शाहनवाज खान यांनी म्हटले आहे.
संवेदनशील प्रसंगी तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात परिस्थितीनुसार ड्राय डे किंवा मद्यविक्रीवरील निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही यापूर्वी करण्यात आल्याचे हाजी शाहनवाज खान यांनी सांगितले.
पोलीस, उत्पादन शुल्क, एफडीए आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त कारवाई हवी
केवळ घोषणा, आश्वासने किंवा जनजागृती मोहिमांवर न थांबता पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे नियमित तपासणी, अचानक तपासणी मोहीम आणि कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने स्पष्ट केले की, ही मागणी कोणत्याही वैध परवानाधारक व्यवसायाविरोधात किंवा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. बेकायदा दारूविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री, सार्वजनिक उपद्रव आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रकारांविरोधात कठोर आणि निष्पक्ष कारवाई व्हावी, एवढीच मागणी आहे.
‘आज कारवाई झाली तर उद्याचे अनेक वाद टाळता येतील!’
वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली, तर भविष्यातील अनेक वाद, भांडणे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या टाळता येऊ शकतात. प्रशासनाने तक्रारी केवळ कागदावर ठेवू नयेत; सीएसएमटीपासून मुंबईतील संवेदनशील भागांपर्यंत प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर कारवाई झालेली दिसली पाहिजे, कायदा सर्वांसाठी समान आहे; त्यामुळे बेकायदा प्रकारांना कोणाचेही संरक्षण असो वा नसो, चौकशी आणि कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे’ अशी ठाम भूमिका हाजी शाहनवाज खान यांनी, महाराष्ट्र कोअर कमिटी शूरा सदस्य तथा कोकण विभाग व गोवा प्रभारी, ऑल इंडिया उलमा बोर्ड यांनी व्यक्त केली.